इंडिया आघाडीची लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती, महाराष्ट्रात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला?

India Alliance : महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. महाराष्ट्रात चार पक्षांमध्ये जागा वाटप होणार आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि वंचित बहुजन आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जात आहे. 

राजीव कासले | Updated: Jan 9, 2024, 03:25 PM IST
इंडिया आघाडीची लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती,  महाराष्ट्रात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? title=

INDIA Alliance : लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) बिगूल वाजलं आहे आणि सर्वच पक्ष जोरदार तयारी लागले आहेत. इंडिया आघाडीत जागावाटपावर बैठका सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्रात इंडिया आघाडीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याचा फॉर्म्युला तयार असल्याचं बोललं जात आहे. या फॉर्म्युलाअंतर्गत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याची रणनिती ठरवण्यात आली आहे. महाराष्ट्रात इंडिया आघाडीतून चार पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. 

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) (NCP), शिवसेना (उद्धव बाळासाहेब गट) (Shivsena UBT) आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) हे चार पक्ष इंडिया आघाडीतर्फे मैदानात असणार आहेत. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्ष 20 जागांवर निवडणूक लढवू शकतो. तर शिवसेनेलाही (उद्धव बाळासाहेब गट) 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सहा जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर वंचित बहुजन आघाडीला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. 

कोणत्या आधारावर जागावाटप?
भाजपच्या हिंदू राष्ट्रवादाला काऊंटर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला इंडिया आघाडीत बरोबरच स्थान दिलं जाणार आहे. फुटीनंतरही शिवसैनिकांचं उद्धव ठाकरेंना समर्थन असल्याचं मानलं जातंय. अजीत पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाजूला झाल्यानंतर शरद पवार गटात जास्त आमदार उरलेले नाहीत. त्यामुळे शरद पवार गटाला कमी जागा देण्यावर मनवलं जाईल. दलित मतं मिळवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन पार्टीलाही जागा दिल्या जातील. 

गेल्या निवडणुकीत कसं होतं प्रदर्शन?
2019 लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप समोर आला होता. 2019 मध्ये भाजप-शिवसेना युतीने एकत्र निवडणूक लढवली. यावेळी भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेने 18 जागा मिळवल्या. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी निवडणूक लढली. यात काँग्रेसला महाराष्ट्रात केवळ एक जागा मिळवता आली. तर राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा जिंकता आल्या. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला एकही जागा जिंकता आली नव्हती. 

इंडिया आघाडीची बैठक
दरम्यान, लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप ठरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.  दिल्लीत मविआने राज्यातल्या जागावाटपासंदर्भात बैठक बोलावली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्या दिल्लीतल्या घरी ही बैठक आयोजीत करण्यात आलीय. ठाकरे गटाकडून संजय राऊत तर शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाडही या बैठकीसाठी उपस्थित राहतील.  महत्त्वाची बाब म्हणजे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बैठकीला येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसंच बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण बैठकीत सहभागी होतील. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. 

भाजपाला सत्तेबाहेर काढण्यासाठी जे जे करावं लागेल ते करणार, त्याच आधारावर सीट शेअरिंग होईल अंस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीत कुठलीही अडचण येणार नाही, फार काही जागा वाटपावर घोळ होईल असं वाटत नाही.काही जागा वाटपाचा मुद्दा आला तर हायलेवलवर निर्णय होईल असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. वंचित संदर्भात आमची सकारात्मक भूमिका आहे. तो प्रस्ताव आज येणार आहे. त्यांची अगोदर पवार साहेबां संदर्भात चर्चा झाल्याचंही नाना पटोले यांनी सांगितलं.