मी राजीनामा दिला, विरोधकांनी घाणेरडे राजकारण केले - संजय राठोड

अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिला.  

Updated: Feb 28, 2021, 04:47 PM IST
मी राजीनामा दिला, विरोधकांनी घाणेरडे राजकारण केले - संजय राठोड  title=

मुंबई : अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिला. दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणाची ( Pooja Chavan case) निष्पक्ष चौकशी होण्यासाठी आपण राजीनामा दिल्याचे संजय राठोड यांनी म्हटले आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर विरोधकांनी घाणेरडे राजकारण केले आणि आपली प्रचंड बदनामी झाल्याचंही राठोड यांनी म्हटले आहे. 

संजय राठोड यांनी पत्नीसह वर्षावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे राजीनामा सोपवला. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण राठोड यांना भोवले आणि राजीनामा द्यावा लागला. राजीनामा देतो पण चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामा स्वीकारु नका, अशी विनंती राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचं समजते आहे. पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यानंतर 20 दिवसांनी राठोड यांनी राजीनामा दिला.

उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधी विरोधक संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी प्रचंड आक्रमक झाले होते. राजीनाम्याशिवाय अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधकांनी दिला होता. अखेर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

राजीनाम्या दिल्यानंतर मीडियासमोर संजय राठोड यांनी आपली भूमिका मांडली आहे. मी माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. बदनामी करून, घाणेरडं राजकारण केले गेले, असा थेट आरोप भाजपवर संजय राठोड यांनी केला आहे. दरम्यान, राजीनामा देतो, पण चौकशी पूर्ण होऊ द्या. दोषी आढळलो तर राजीनामा मंजूर करा, अशी विनंती संजय राठोड यांनी राजीनाम्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना विनंती केली. राजीनामा घेऊ नये यासाठी बंजारा समाजातील महंतांचेही प्रयत्न होते. मात्र, त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.