हेमा वाणी यांच्या जिद्दीची कहाणी

मुंबई : मनात जिद्द असेल तर सगळं काही शक्य आहे हे नवी मुंबईतल्या हेमा वाणीची गोष्ट हेच शिकवते. एका मोठ्या आणि नीटनेटक्या पार्लरचा कारभार अतिशय समर्थपणे हाताळणा-या या हेमा वाणी. आता त्यांचा हा ब्युटी पार्लरचा व्यवसाय उत्तम सुरू असला तरी त्यामागे मोठा संघर्ष आहे.

वयाच्या २१ व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. सुखी संसाराची स्वप्नं रंगवत असतानाच नव-याशी सतत भांडणं होऊ लागली. भांडणं एवढी टोकाला गेली की स्टोव्हच्या भडक्यात त्या २५ टक्के भाजल्या. त्याचवेळी हेमा यांच्या आईला अर्धांगवायूचा झटका आला. एकाच वेळी दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला. 

माहेरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्यानं त्या त्रास सहन करत सासरी राहिल्या. त्यांना एक मुलगीही झाली  पण नव-यानं दोघांनाही नाकारलं. मग त्यांनी खंबीरपणे उभं राहायचं ठरवलं आणि  ब्युटी पार्लरचं काम शिकल्या. सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत हेच काम करायचं. शैक्षणिक कर्ज काढून ब्युटीशियनचा कोर्स पूर्ण केला. स्वतःचं पार्लर सुरू केलं. आता बेलापूरमध्ये दोन आणि खारघरमध्ये एक अशी त्यांची तीन पार्लर आहेत.शिक्षण राहून गेलं याची खंत असल्यानं त्या आता पदविकेचं शिक्षण घेत आहेत.  

परिस्थितीनं बंड केलंलं असताना हेमा वाणी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि सगळ्या संकटांशी यशस्वी मुकाबला केला. आता इतरांनाही त्यांनी स्वतःच्या पायावर उभं केलं आहे. शेवटी पेला अर्धा भरला आहे की अर्धा सरला आहे..... ते ठरवणं तुमच्याच हाती आहे.