मुंबई : काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी केंद्रीयमंत्री गुरुदास कामत यांच बुधवारी सकाळी दिल्लीत निधन झालं. त्यानंतर काल रात्री दहा वाजेच्या सुमारास गुरुदास कामत यांच पार्थिव दिल्लीहुन मुंबईत आणण्यात आलं. विमानतळावरून कामत यांच पार्थिव त्यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी दाखल झालं तेव्हा शेकडोच्या संख्येत कार्यकर्ते हजर होते. त्याचबरोबर भाजपचे कॅबिनेट मंत्री प्रकाश मेहता, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री नसीम खान यावेळी हजर होते. गुरुदास कामात यांच्यावर आज सकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सकाळी ८.३० ते १०.३० पर्यंत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर चेंबूरच्या चरई स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ते अत्यंत जवळचे मानले जात. मुंबईमध्ये काँग्रेसची उभारणी करण्यात कामत यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांच्या जाण्याने काँग्रेसमधले एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व गमावले आहे. काँग्रेसच्या सर्व पदांचा राजनीमा देत त्यांनी स्वत:ला कार्यमुक्त केले होते.
१९७२च्या सुमारास विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश केलेल्या कामथ यांची नाळ काँग्रेस पक्षाशी जुळली. काँग्रेसनेही त्यांच्यावर वेळोवेळी विश्वास दाखवत विविध आणि महत्त्वपूर्ण पदांची जाबाबदारी सोपवली. आपल्या एकूण राजकीय कारकिर्दीतील बराच कालावधी त्यांनी लोकसभेवर प्रतिनिधीत्व केले. १९८४मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. यूपीए सरकारच्या काळाता (२००९ ते २०११) राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. केंद्रीय गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला. मात्र, २०१४ मध्य़े झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभरात आलेल्या काँग्रेस विरोधी लाटेत शिवसेनेच्या गजानन किर्तीकरांकडून त्यांचा पराभव झाला.
दरम्यान, अलिकडील काही वर्षांत मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजीला उधाण आले होते. त्यातच कामत यांचे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहिलेल्या संजय निरुपम यांच्याबरोबर वाद झाले. या वादातून त्यांनी काँग्रेसच्या सर्वपदांचा राजीनामा देऊन कार्यमूक्त राहण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये त्यांची विशेष ताकद होती.