ब्रेक द चेन : शिवभोजन केंद्रासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव (Coronavirus in Maharashtra)  लक्षात घेता कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  

Updated: Apr 17, 2021, 08:44 AM IST
ब्रेक द चेन :  शिवभोजन केंद्रासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित title=

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव (Coronavirus in Maharashtra)  लक्षात घेता कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता ‘ब्रेक द चेन’ची (Break the Chain) प्रक्रिया राज्यभर सुरु झाली आहे. या कालावधीत गरीब आणि गरजू लोकांना जेवणाअभावी हाल-अपेष्टा सहन कराव्या लागू नयेत यासाठी शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना नि:शुल्क ( Free Shivbhojan Thali) उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात शिवभोजन (Shivbhojan) केंद्रासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

15 एप्रिल 2021पासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात यावी. या कालावधीत संपूर्ण राज्याचा शिवभोजन थाळीचा इष्टांक दोन  लाख प्रतिदिन एवढा राहील. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

- शिवभोजन थाळीच्या राज्याच्या इष्टांकामध्ये वाढ करण्यात आली असल्याने सद्यस्थितीत सुरु असलेल्या शिवभोजन केंद्रांच्या प्रतिदिन इष्टांकामध्ये दीडपट वाढ करण्यात येत आहे. ( उदा. शिवभोजन केंद्राचा इष्टांक 100 असल्यास पुढील एक महिन्यासाठी त्याचा इष्टांक 150 एवढा राहील.)  एक महिन्यानंतर सदर इष्टांक पूर्वरत होईल.

- शिवभोजन केंद्रावर निर्जंतुकीकरणाच्या नियमांचे पालन करुन शिवभोजन केंद्रातून दुपारी 11.00 ते 4.00 या कालावधीत पार्सल सुविधेद्वारे (Take away) ग्राहकांना शिवभोजन उपलब्ध करुन देण्यात यावे.

- या वेळेत कोणताही लाभार्थी शिवभोजनाविना परत जाणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

- कोणत्याही सबळ कारणांशिवाय शिवभोजन केंद्र बंद राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

- संपूर्ण शिवभोजन केंद्राचे दररोज निर्जंतुकीकरण करावे.

- शिवभोजन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तसेच पार्सल घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाने मुखपट्टी (मास्क) वापरणे बंधनकारक राहील.

- शिवभोजन केंद्रावर सामाजिक अंतराच्या नियमांचे कसोशीने पालन करावे.

- शिवभोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुवावेत.

- खोट्या नावाने तसेच तीच-ती लाभार्थ्यांची छायाचित्रे शिवभोजन ॲपवर टाकली जाणार नाहीत याची खबरदारी शिवभोजन केंद्र चालकाने घ्यावी.

- सर्व शिवभोजन केंद्रांची पुरवठा यंत्रणेद्वारे या महिन्यात किमान एक वेळ काटेकोर तपासणी करण्यात यावी.