शिवभोजन थाळीचं सोशल ऑडिट होणार; तक्रारी असलेल्या सेंटर्सवर कारवाईचे संकेत

ठाकरे सरकारची महत्त्वाकांक्षी योजना शिवभोजन थाळीचं  सोशल ऑडिट होणार आहे. तक्रारी असलेल्या सेंटर्सवर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. 

Updated: Nov 12, 2022, 06:11 PM IST
शिवभोजन थाळीचं सोशल ऑडिट होणार;  तक्रारी असलेल्या सेंटर्सवर कारवाईचे संकेत   title=

योगेश खरे, झी मीडिया, मुंबई : सत्तेत आल्यापासून शिंदे-फडणवीस सरकारने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या अनेक  योजनांवर आक्षेप घेतला आहे. त्यातच आता ठाकरे सरकारने सुरु केलेली शिवभोजन थाळी देखील शिंदे-फडणवीस सरकारच्या रडारवर आली आहे. ठाकरे सरकारची महत्त्वाकांक्षी योजना शिवभोजन थाळीचं सोशल ऑडिट होणार आहे. शिवभोजन थाळी (Shivbhojan Thali) केंद्राबद्दल नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. यामुळे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी मुंबई येथील केंद्रांना अचानक भेट दिली.तक्रारी असलेल्या सेंटर्सवर कारवाईचे संकेत देखील सरकारने दिले आहेत.  

ठाकरे सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन थाळीचं शिंदे फडणवीस सरकार सोशल ऑडिट करणार आहे. सोशल ऑडिटसाठी यशदा आणि टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सची नियुक्ती करण्यात आली आहे.  प्रत्येक जिल्ह्यातील लाभार्थ्यांकडून या संदर्भात माहिती घेतली जाणार आहे. योजनेचा किती जणांना लाभ झाला, काही सुधारणा अपेक्षित आहे का? योजनेत पारदर्शकता आहे का अशी माहिती गोळा केली जाणार आहे.

तक्रारी असलेल्या सेंटरबाबत सरकार मोठा निर्णय घेणार आहे. सध्या योजना बंद करण्याचा विचार नाही, पण बदल मात्र होणार आहेत. बहुसंख्य शिवभोजन थाळी केंद्रे शिवसैनिकांकडून तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून चालविली जात आहेत. त्यामुळे ही केंद्रे आता शिंदे गटाच्या रडारवर आली आहेत. 

मुंबईचे पालकमंत्री दादा भुसे  केंद्रातील स्वच्छता, जेवणाचा दर्जा तपासला. स्वत: पदार्थांची चव घेतली. थेट जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नर्सीकर यांना पत्राद्वारे शिवभोजन थाळीच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याचे सूचना देखील त्यांनी केल्या आहेत.