मुंबई : दहीहंडी, गणेशोत्सवासारख्या हिंदूंच्या सार्वजनिक उत्सवांवर घालण्यात आलेले निर्बंध हटवण्यासाठी हालचाली सुरू झाल्यायत.. त्यासाठी गोविंदा पथकांनी बुधवारी सिद्धीविनायकाला जाऊन साकडं घातलं. तर गुरूवारी दहीहंडी आणि गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिका-यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दरबारात हजेरी लावली. सण साजरे करताना अडचणीचे ठरणारे नियम शिथील करण्याचं सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केलं.
मंडप आणि ध्वनीक्षेपक परवानगी तत्काळ देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. सणांमध्ये अडथळे आणणारे सायलेन्स झोनचे नियम शिथील करण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात येईल. त्यासाठी प्रसंगी नियम शिथील करणारा अध्यादेशही काढण्यात येईल, असं संकेत यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. दहीहंडीबाबत 10 जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होणार आहे. त्यावेळी विशेष सरकारी वकील गोविंदा पथकांना अनुकूल भूमिका सरकारच्या वतीनं मांडतील, असंही स्पष्ट करण्यात आलं.
दरम्यान, यानिमित्तानं पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाचा लढा सुरू झालाय. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या पुढाकारानं मुख्यमंत्र्यांकडं बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र त्याआधीच शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सायलेन्स झोनबाबतचं निवेदन दिलं.
श्रेयाचं लोणी लाटण्यासाठी शिवसेना विरूद्ध भाजप एकमेकांना पुन्हा एकदा भिडलेत. पण त्यांच्यातल्या स्पर्धेमुळं सार्वजनिक उत्सव समित्या मात्र सुखावल्यात. कुणाच्याही कोंबड्यानं का होईना, पण सणांवरील निर्बंध हटवल्याचा दिवस उजाडावा, एवढीच त्यांची अपेक्षा आहे.