Gondia Crime : एखाद्या घटनेचा राग माणसाला दुसऱ्याचे आयुष्य संपविण्यापर्यंत नेऊ शकतो. रागाच्या भरात माणूस कोणत्या थराला जाऊ शकेल, हे सांगता येत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार गोंदीयातून समोर आला आहे. एका तरुणाचे आपल्या बहिणीशी प्रेम संबंध असल्याच्या राग भावाला स्वस्त बसू देत नव्हता. या तरुणाचा काटा काढायचा विचार त्याच्या मनात चालू असायचा. अखेर एका रात्री त्याने कट रचलाच. काय आहे ही घटना? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
प्रेमसंबंधांच्या कारणातून एकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गोंदिया शहरापासून जवळच असलेल्या कुडवा येथील गोंडीटोला चौक परिसरामध्ये घडली. प्रज्वल मेश्राम (20) असे मृतकाचे नाव आहे. तर संकेत बोरकर (20) असे आरोपीचे नाव आहे. संकेतच्या बहिणीचे प्रेमसंबंध प्रज्वल याच्यासोबत होते. ही गोष्ट भाऊ संकेतला खटकत होती. माझ्या बहिणीशी प्रेमसंबंध ठेवू नकोस असे संकेतने प्रज्वलला अनेकवेळा सांगितले. मात्र प्रज्वल याने ऐकले नाही, असे संकेत सांगतो.
अखेर आरोपी संकेतने प्रज्वल याचा काटा काढण्याचा कट रचला. यासाठी त्याने रात्री 2 वाजताची वेळ ठरवली. त्यावेळी संकेतने आपल्या मित्रासह प्रज्वलला गाठले आणि त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. या घटनेत प्रज्वलचा मृत्यू झाला.
रामनगर पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी संकेत बोरकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर संकेत बोरकर याचा एक साथीदार जखमी असल्याने त्याला नागपूर येथे रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.