Fake Call : आतापर्यंत तुम्ही फेक कॉल्सद्वारे (Fake Call) सामान्यांची फसवणूक झाल्याचं ऐकलं असेल. मात्र फेक कॉल करत 6 भाजप आमदारांची (BJP MLA) फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांच्या (JP Nadda) जवळचा माणूस असल्याचं सांगत एका व्यक्तीनं 6 भाजप आमदारांना फोन केला, मंत्रीपदाचं आमिष दाखवून या भाजप आमदारांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. नीरजसिंह राठोड असं फसवणूक करणाऱ्या आरोपीचं नाव आहे त्याला गुजरातच्या मोरबीतून (Morbi, Gujrat) अटक करण्यात आलीय.
या आरोपीनं भाजपचे बदनापूरचे आमदार नारायण कुचे (Narayan Tilakchand Kuche) यांना जेपी नड्डांच्या नावानं मंत्रिपदाची ऑफर देत पैसे उकळले. तर मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे (Vikas Kumbhare), कामठीचे भाजप आमदार टेकचंद सावरकर (Tekchand Sawarkar), आणि हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे (Tanaji Sakharamji Mutkule) यांच्याकडेही पैशांची मागणी केली. हा तोतया व्यक्ती भाजप आमदारांना फोन करुन काय बतावणी करत होता त्याची ऑडिओ क्लीपही व्हायरल झालीय. नीरजसिंह राठोड हा ठग फक्त नड्डांच्या जवळचा माणूस आहे इतकच सांगत नव्हता तर नड्डांचा आवाजात त्यानं फोनही केले.
आमदारांना फेक कॉल
बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी फोनवर त्या व्यक्तीने काय सांगितलं याची माहिती दिली. फोन करणाऱ्या व्यक्तीने नड्डा साहेबांची पत्नी आणि मुलगी येणार आहे, त्यांच्या विमानाच्ं तिकिट काढायचं आहे असं सांगितलं. यावर आमदार कुचे यांनी पन्नास हजार रुपये फोन पे केले, एकुण 2 लाख 35 हजार रुपयांची मागणी केली होती. असाच फोन विकास कुंभारे यांना केला. जेपी नड्डा साहेबांचा मेसेज असून कर्नाटकात भाजपचं सरकार बनण्यास थोड्या अडचणी आहेत त्यामुळे काही फंड द्यावा लागेल, असं समोरच्या व्यक्तीने कुंभारे यांना सांगितलं. तर कामठीचे आमदार यांना थेट मंत्रीपदाचीच ऑफर देण्यात आली. आमदार टेकचंद सावरकर यांना त्या व्यक्तीने मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगत तुम्ही काही मदत करा असं त्यांना सांगण्यात आलं.
अशी पकडली गेली चोरी
आमदारांना संशय येताच त्यांनी तक्रार दाखल केली. नागपूर पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन नीरजसिंह राठोड या ठगाला ताब्यात घेतलंय. फक्त महाराष्ट्रच नाही तर गोवा आणि नागालँडमधील भाजप आमदारांनाही या ठगानं गंडा घालण्याचा प्रयत्न केला. पोलीस तपासात त्याची टोळी देशभर सक्रिय असल्याचं समजतंय. त्यामुळे आता आमदारांनो सावधान.. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका.. तो तुमच्यासाठी सापळा असू शकतो..