शिवसेनेत अंतर्गत वाद, माजी नगरसेविकेने विभाग प्रमुखाला कानफटवलं, VIDEO व्हायरल

शिवसेनेच्या माजी नगरसेविकेने शिवसेना विभाग प्रमुखालाच केली मारहाण, घटना CCTV मध्ये कैद

Updated: Apr 4, 2022, 01:47 PM IST
शिवसेनेत अंतर्गत वाद,  माजी नगरसेविकेने विभाग प्रमुखाला कानफटवलं, VIDEO व्हायरल title=

नवी मुंबई : नवी मुंबईत (Navi Mumbai) शिवसेनेतील (shiv sena) अंतर्गत वाद समोर आला आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेविका भारती कोळी आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेच्या विभाग प्रमुखाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

माजी नगरसेविका भारती कोळी आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेना विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांना मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी प्रकाश आमटे यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी माजी नगरसेविका भारती कोळी आणि त्यांच्या आठ समर्थकांवर मारहाण, शिवीगाळ, आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?
नवी मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आली असल्याने घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांकडून जोर लावला जातोय. याच पार्श्वभूमीवर भाजपने एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला भाजप नेते देवेंद्र फडणवीस, आमदार गणेश नाईक उपस्थित होते. या कार्यक्रमात शिवसेनेच्या माजी नगरसेविका भारती कोळी समर्थकांसह उपस्थित होत्या, तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला होता. 

विभागप्रमुखांनी पाठवला अहवाल
या संपूर्ण घटनेचे फोटो आणि व्हिडिओ शिवसेना विभागप्रमुख प्रकाश आमटे यांनी पक्षाच्या वरिष्ठांना पाठवला. त्यामुळे संतप्त झालेल्या भारती कोळी यांनी समर्थकांसह प्रकाश आमटे यांच्या घरी येत त्यांना जाब विचारला तसंच त्यांना मारहाण केली.