ICICI-Videocon आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी चंदा कोचर यांच्या पतीला अटक

चंदा कोचर यांनी एमडी आणि सीईओ असताना पदाचा गैरवापर करुन व्हिडीओकॉन कंपनीला कर्ज मंजूर केले होते

Updated: Sep 7, 2020, 10:24 PM IST
ICICI-Videocon आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी चंदा कोचर यांच्या पतीला अटक title=

मुंबई: व्हीडिओकॉन समूहाला देण्यात आलेल्या कर्जातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून ED सोमवारी आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्य़कारी अधिकारी चंदा कोचर यांचे पती  दीपक कोचर यांना अटक करण्यात आली. ICICI बँकेने व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या कर्जात झालेली अनियमितता आणि मनी लॉन्ड्रींग प्रकरणी चंदा कोचर, त्यांची पती दीपक कोचर आणि अन्य लोकांविरुद्ध चौकशी सुरू आहे.
चंदा कोचर आणि त्यांच्या पतीविरोधात PMLA नुसार ईडीने गुन्हा नोंदवला होता. चंदा कोचर यांनी एमडी आणि सीईओ असताना पदाचा गैरवापर करुन व्हिडीओकॉन कंपनीला कर्ज मंजूर केले होते. ते कर्ज पुढे बुडीत खात्यात गेले. 

याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून कोचर दाम्पत्याची चौकशी सुरु होती. मात्र, चौकशीदरम्यान दीपक कोचर यांना समाधानकारक उत्तर देता आली नाहीत. आजही दीपक कोचर यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. चौकशी संपल्यानंतर त्यांना ईडीने अटक केली.आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे चंदा कोचर यांनाही आयसीआयसीआय बँकेच्या पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. 

काय आहे प्रकरण?
डिसेंबर २००८ मध्ये व्हीडिओकॉन समूहाच्या वेणुगोपाल धुत यांनी दीपक कोचर आणि चंदा कोचर यांच्या नातेवाईकांना घेऊन  न्यू पॉवर रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली होती. यानंतर व्हीडिओकॉन समूहातर्फे या कंपनीला ६४ कोटींचे कर्ज देण्यात आले. यानंतर काही दिवसांतच ही कंपनी दीपक कोचर यांच्या नेतृत्त्वाखालील विश्वस्त मंडळाकडे सोपवण्यात आली होती. 

मात्र, या व्यवहाराच्या सहा महिने आधी आयसीआयसीआय समूहाकडून व्हीडिओकॉन समूहाला ३,२५० कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. व्हीडिओकॉन समूहाने यापैकी ८६ टक्के रक्कमेची परतफेड केली नाही. अखेर २०१७ साली हे कर्ज बुडीत खात्यात जमा झाले. हे सर्व हितसंबंध समोर आल्यानंतर २०१७ मध्येच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणाची चौकशी सुरु केली होती.