अधिवेशनात प्रश्न कोणापुढे मांडावे हा प्रश्न - फडणवीस

शेतकरी प्रश्नावर विरोधक आक्रमक होणार...

Updated: Dec 15, 2019, 01:58 PM IST
अधिवेशनात प्रश्न कोणापुढे मांडावे हा प्रश्न - फडणवीस  title=

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटलं की, 'महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सुरु होत आहे. विरोधीपक्ष म्हणून आम्ही यात सहभागी होणार आहोत. पण विषय कोणापुढे मांडायचे, आमच्या प्रश्नांना उत्तर कोण देणार याबाबत प्रश्न पडला आहे. शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे सरकारची कामं थांबली आहेत.' 

शेतकऱ्यांना मदत कधी?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 25 हजार प्रति हेक्टरी मदत देणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही मदत द्यावी. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाणार. असं ही त्यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे हे कधी होणार असा आमचा प्रश्न आहे.

शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. सरकार स्थापन झाल्य़ानंतर पहिलंच अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ठाकरे सरकारचा कस लागणार आहे. शेतकरी कर्जमाफी, प्रकल्पांना स्थगिती, खातेपाटप यांसारख्या मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडित पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत त्याचे संकेत ही दिले. 

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यास विलंब होत असल्याने भाजपन या मुद्द्यावर आक्रमक होईल. निवडणुकीपूर्वी केलेली वक्तव्य आणि आश्वासनांची सत्ताधाऱ्यांना आठवण करून दिली जाईल असं भाजपने म्हटलं आहे.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेत विरोधकांची भूमिका स्पष्ट केली. दुसरीकडे विरोधकांनी अधिवेशनाच्या आधी होणाऱ्या चहापानावर ही बहिष्कार टाकला आहे.