अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : विधानपरिषदमध्ये आजचा दिवस अभूतपूर्व गोंधळाने गाजला. आज अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर हे अर्थसंकल्प मांडत असतांना त्यांना चक्क थांबवण्यात आले आणि कामकाज 10 मिनिटाकरता तहकूब करण्यात आले.
अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी 2 वाजता अर्थसंकल्प विधानपरिषदमध्ये मांडायला सुरुवात केली. साधारण 45 व्या मिनिटाला विधानपरिषदमधील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. अर्थसंकल्पातील मुद्दे हे सभागृहात सादर होण्याआधीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्विटवर प्रसिद्ध व्हायला सुरुवात होत असल्याचं धनंजय मुंडे यांनी निदर्शनास आणले.
तेव्हा राज्याचा हा अर्थसंकल्प सभागृहात मांडण्यापुर्वीच बाहेर फुटल्याचा आरोप मुंडे यांनी केला. हा राज्याच्या दोन्ही सभागृहाचा व सदस्यांचा अपमान झाला असल्याची टीका मुंडे यांनी केली.
तेव्हा विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली असतांना सत्ताधारी पक्षातील सदस्यांनीही प्रतिउत्तर दयायला सुरुवात केली. अर्थसंकल्प मांडला जात असतांना अचानक अभूतपूर्व असा गोंधळ झाल्याने सभापती रामराजे निंबाळकर यांनी विधानपरिषदचे
कामकाज 10 मिनिटकरता तहकूब केले. मात्र सभागृह सुरू होताच सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक रूप धारण केले आणि यामुळे सभागृहही अवाक झाले.
इतिहासात हे पहिल्यांदा झाले आहे की अर्थसंकल्प थांबवला गेला आहे. तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तुम्ही असा अर्थसंकल्प थांबवायला नको होता, मुंडे यांनी केलेल्या आरोपाची चौकशी काय ते नंतर करता येईल असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी सभापती रामराजे निंबाळकर यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणत असल्याचं सांगितलं.
मात्र तोपर्यंत प्रकरण वाढत असल्याचं लक्षात आल्याने विषय आणखी न ताणता अर्थसंकल्प मांडायला सुरुवात करायची सूचना अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांना केली आणि प्रकरणावर पडदा टाकला.