'सहा वर्ष खासदार असताना काय दिवे लावले ? सचिनकडून भारतरत्न काढून घ्या !'

क्रिकेटपट्टू सचिन तेंडुलकरवर चहुबाजूने टीका 

Updated: Feb 5, 2021, 03:10 PM IST
'सहा वर्ष खासदार असताना काय दिवे लावले ? सचिनकडून भारतरत्न काढून घ्या !' title=

मुंबई : शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्वीट केल्यानंतर क्रिकेटपट्टू सचिन तेंडुलकरवर चहुबाजूने टीका होतेय. सचिन तेंडुलकरचा 'भारतरत्न' काढून घेतला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आलीय. सचिन तेंडुलकर भाजपची दलाली करण्यासाठी शेतकऱ्यांच्या विरोधात बोलत आहे. शेतकरी स्व-संरक्षणासाठी आंदोलन करत आहे हे दिसत नाही का...? असा प्रश्न प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी उपस्थित केलाय.  

रिहानानं शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून ट्विटरवर काही प्रश्न उपस्थित केले होते. त्याला सचिनने ट्वीट करुन उत्तर दिले. 'भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड होऊ शकत नाही. बाहेरच्यांनी प्रेक्षक म्हणून पाहावं, यामध्ये भाग घेऊ नये. तसेच भारताबाबत काय करायचं ते भारतीय ठरवतील, असा सल्ला सचिननं रिहानाला ट्विटरवरून दिला होता.  

शेतकरी आंदोलनाबाबत ट्विटरवरून प्रश्न उपस्थित करणाऱ्या हॉलिवूड स्टार रिहानाला सचिन तेंडुलकरनं फटकारलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पॉप स्टार रिहानासह अनेकांना सडेतोड उत्तर दिलं आहे. भारताच्या खासगी प्रश्नावर अनेकांनी दखल देण्याचा प्रयत्न केला. 

शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून शेतात जे धन्य पिकवलेले आहे, तेच खातात आणि त्यांच्याच विरोधात बोलण्याची यांची हिंमत कशी होते...? असा प्रश्न संभाजी ब्रिगेडने उपस्थित केले. 

सहा वर्ष राज्यसभेचे खासदार असताना सचिन तेंडुलकरने काय दिवे लावले ? असा प्रश्न उपस्थित करत देश एकसंघ ठेवण्यासाठी साधा एकही लोकहीताचा प्रश्न कधीच विचारलं नाही. ही मानसिक व वैचारिक गुलामी आहे. असं संभाजी ब्रिगेडने म्हटलंय. शेतकरी जर जगाचा पोशिंदा असेल तर, त्यांना सन्मानाची वागणूक आणि पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केलीय.