मुंबई : काँग्रेसची तक्रार म्हणजे असंवेदनशील प्रकार असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या तक्रारीवर नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचा विषयी काँग्रेसने तक्रार केली आहे. या आमदारांऐवजी त्याचे समवेत इतर सहकारीने मतपत्रिका बॉक्स मध्ये टाकल्या असा आक्षेप काँग्रेसकडून घेण्यात आलाय.
पुण्यातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक या कॅन्सरनं त्रस्त आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र तरी देखील मतदान करण्यासाठी त्या विधानभवनात आल्या होत्या. पक्षाने दिलेले आदेश मानायचे हे पहिल्यापासून आमच्या रक्तात आहे. त्यामुळे मतदाना केल्याचं मुक्ता टिळक यांनी म्हटलं आहे.
भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे देखील काही महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर ही उपचार सुरु आहेत. पण अशातही आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी ते मुंबईत आले आहेत.
मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना कंपॅनियनची गरज लागेल, पाहताक्षणी कुणाच्याही सहज लक्षात येईल. त्यामुळे आम्ही व्हीलचेअर आणि कंपॅनियनसाठी निवडणूक आयोगाकडून रीतसर पूर्वपरवानगी घेतली होती. तरीही काँग्रेसनं असा आक्षेप घेणं दुर्दैवी आणि काँग्रेसची पराभूत मानसिकता दाखवणारा आहे.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 20, 2022
विधानपरिषदेसाठीही भाजप विरुद्ध महाविकासआघाडीत मोठी चूरस आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने 5 उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे ही निवडणूक होत आहे. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या 25 ते 26 मतांची आवश्यकता असेल. गुप्त पद्धतीने मतदान होत असल्याने मतांची फाटाफूट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. भाजपचा पाचवा आणि काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराकडे विजयासाठी पुरेशी मतं नाहीत. त्यामुळे अपक्ष आणि छोटय़ा पक्षांच्या 29 आमदारांना विशेष महत्त्व प्राप्त झालंय.