मुंबई : सीएएच्या निषेधार्थ राजीनामा दिलेले सनदी अधिकारी अब्दुर रेहमान यांना पुन्हा सेवेत येण्याची विनंती राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. 'रेहमान यांनी वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद स्वीकारावे आणि समाजासाठी काम करावे', अशी विनंती मलिक यांनी केली आहे. अद्याप रेहमान यांनी आपला होकार कळवलेला नाही.
रेहमान हे राज्य मानवी हक्क आयोगात आयजी पदावर कार्यरत होते. मात्र, डिसेंबर महिन्यात त्यांनी केंद्र सरकारच्या सीएए कायद्याचा विरोध करत सेवेचा राजीनामा दिला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकारमधील काँगेस, राष्ट्रवादीचाही सीएए कायद्याला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी रेहमान यांचीशी संपर्क केला आणि त्यांना पुन्हा सेवेत येण्याची विनंती केली आहे.
अब्दुर रेहमान महाराष्ट्र मानवाधिकार आयोगात 'आयजीपी' पोस्टवर कार्यरत होते. 'नागरिकत्व सुधारणा विधेयक संविधानविरोधी आहे. मी या विधेयकाचा विरोध करतो. मी सविनय अविज्ञेनं उद्यापासून कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतलाय. मी सेवेतून राजीनामा देतोय' असं सोशल मीडियावर म्हणत रेहमान यांनी पदावरून दूर होत असल्याचं जाहीर केलं होतं.
अब्दुर रेहमान यांनी त्यापूर्वी ऑगस्ट २०१९ मध्ये व्हीआरएसची मागणी केली होती. त्यानंतर २५ ऑक्टोबर २०१९ रोजी राज्य सरकारनं केंद्रीय गृह मंत्रालयाला त्यांच्या व्हीआरएसची शिफारस केली होती. परंतु, गृह मंत्रालयानं ही मागणी फेटाळून लावली होती.