Omicron Update : राज्यात ओमायक्रॉनचा विळखा वाढला, आज आणखी 11 रुग्ण आढळले

नव्या वर्षाच्या स्वागतापूर्वीच मुंबईत ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने धाकधूकही वाढली आहे.

Updated: Dec 21, 2021, 08:04 PM IST
Omicron Update : राज्यात ओमायक्रॉनचा विळखा वाढला, आज आणखी 11 रुग्ण आढळले title=
संग्रहित छाया

मुंबई : महाराष्ट्रासाठी आताची सर्वात मोठी आणि तितकीच चिंता व्यक्त करणारी बातमी आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा विळखा वाढत चालला आहे. राज्यात आज आणखी नवे 11 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले. यापैकी 8 रुग्ण मुंबई विमानतळावरील तपासणीत आढले असून पिंपरी-चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबईत प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. 

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार आज आढळलेल्या अकरा रुग्णांमुळे महाराष्ट्रात आता ओमायक्रॉनच्या एकुण रुग्णांची संख्या 65 इतकी झाली आहे. 

यापैकी 34 रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. 

आज आढळलेल्या रुग्णांची माहिती
मुंबईतील 8 रुग्ण हे विमानतळावरील सर्वेक्षणातून आढळले आहेत. यात केरळ, गुजरात आणि ठाणे इथले प्रत्येकी 1 रुग्ण आहेत. तर इतर पाच जण हे मुंबईतील आहेत. यामध्ये 18 वर्षांखालील दोन मुलं आहेत. 18 वर्षाखालील मुलं वगळता इतर सर्वांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. सर्व रुग्ण हे लक्षणं विरहित सौम्य गटातील आहेत.

आठ रुग्णांपैकी 2 जण युगांडा इथून, इंग्लंडमधून 4 जण तर दुबई इथून 2 जण भारतात आले आहेत. 

दरम्यान, उस्मानाबाद मधला याआधी ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या रुग्णाची 13 वर्षांची निकटसहवासित मुलगी आज ओमायक्रॉन बाझित आढळली. तिला कोणतीही लक्षणं नाहीत. तर केनियावरुन हैदराबाद मार्गे आलेला नवी मुंबई इथला एक 19 वर्षांचा युवक ओमायक्रॉन बाधित आढळला आहे. त्याचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे.

कोणत्या ठिकाणी किती रुग्ण
राज्यात आतापर्यंत 65 रुग्ण आढळले असून यापैकी सर्वाधिक 30 रुग्ण मुंबईतील आहेत. पिंपरी-चिंचवड 12, पूणे ग्रामीण 7, पुणे मनपा 3, सातारा 3, कल्याण-डोंबिवली 2, उस्मानाबाद 3, बुलडाणा 1, नागपूर 1 लातूर 1, वसई-विरार 1 आणि नवी मुंबई 1 रुग्ण आढळला आहे.