आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, पोलिसांनी आवळल्या काही तासातच आरोपीच्या मुसक्या

आग्रीपाडा येथे आजीसोबत राहणाऱ्या एका ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.  

Updated: May 21, 2022, 08:22 PM IST
आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, पोलिसांनी आवळल्या काही तासातच आरोपीच्या मुसक्या  title=

मुंबई : पीडित मुलगी आपल्या आजीसोबत आग्रीपाडा येथे रहाते. शुक्रवारी संध्याकाळी ती चिमुरडी आईस्क्रीम आणण्यासाठी इमारतीच्या खाली आली होती. ही संधी साधून ३८ वर्षीय आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.

बराच वेळ होऊनही नात घरी परत न आल्याने आजीने तिचा शोध घेतला. त्यावेळी ती चिमुरडी परिसरातील गणराज इमारतीखाली शांत उभी असल्याचे आजीला दिसले.

आजीने मुलीला घरी नेत तिची विचारपूस केली असता ती जोराने रडू लागली. यावरून आजीला काही तरी अनुचित घडल्याचा संशय आला. आजी आणि शेजारच्यांनी त्या मुलीला विश्वासात घेतले असता परिसरात राहणाऱ्या तरुणाने अत्याचार केल्याची माहिती तिने दिली.

आजीने पोलिसांना १०० नंबरवर या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करत काही तासांच्या आत ३८ वर्षाच्या एका नराधमास अटक केली. त्या नराधमावर याआधीही पॉस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

दरम्यान, पीडित मुलीची नायर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात पुढील तपास आग्रीपाडा पोलीस करत आहेत.