डॉ. प्रतापसिंह जाधव यांना आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर

आपल्या सडेतोड आणि निस्पृह लेखणीने पत्रकारितेत डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे 

Updated: Aug 13, 2021, 07:09 PM IST
डॉ. प्रतापसिंह जाधव यांना आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर title=

मुंबई : पत्रकारितेत गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ आपल्या कर्तृत्वाचा सखोल ठसा उमटविणारे आणि पत्रकारितेत नवीन मानदंड उभा करणारे ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा सन 2020चा प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर करण्यात आला. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी ही घोषणा केली. 2021चा आचार्य अत्रे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांना देण्यात आला आहे.

डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी 1969 साली ‘पुढारी’ची धुरा स्वीकारली. अर्धशतकाहून अधिक काळ संपादक म्हणून आपल्या सडेतोड आणि निस्पृह लेखणीने पत्रकारितेत स्वतंत्र स्थान निर्माण करणारे ते एकमेव संपादक आहेत. ‘पुढारी’च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत अनेक सार्वजनिक प्रश्नांच्या लढ्यांना पाठबळ देताना त्यांनी स्वतः अनेक आंदोलनांचं नेतृत्व केलं आहे.

अनेक पुरस्कारांनी गौरव

त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा गौरव म्हणून त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. पत्रकारितेतील मानाचा ‘पांचजन्य’ नचिकेता पुरस्कार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार, स्वामी विवेकानंद पीठ झाशी यांचा देशभक्तीपर आणि निर्भीड पत्रकारितेबद्दल स्वामी विवेकानंद पुरस्कार, हिमाचल प्रदेश युनिव्हर्सिटीमार्फत सन्माननीय डि.लिट. पदवी, नवी दिल्ली येथील अहिंसा ट्रस्टच्या वतीने निर्भीड पत्रकारितेबद्दल अहिंसा पुरस्कार, पुण्यातील सूर्योदय फाऊंडेशनचा सूर्यदत्ता जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.