आतिष भोईर, झी मीडिया, डोंबिवली : मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणाऱ्या लोकलने आणखी एकाचा जीव घेतला आहे. डोंबिवलीत राहणाऱ्या २२ वर्षीय चार्मी पासद या तरुणीचा लोकलमधून पडून नाहक बळी गेला. चार्मी ही गर्दीची पहिली बळी नसून यापूर्वी सात प्रवाशांना अशा प्रकारे जीव गमाविण्याची वेळ आली आाहे. याआधी भावेश नकाते, धनश्री गोडवे, रजनीश सिंग, नितेंद्र यादव, सविता नाईक आणि शिववल्लभ गुजर याचा मृत्यू झाला होता.
डोंबिवली पूर्वेतील भोपर परिसरात नवनीतनगर कॉम्पलेक्समध्ये राहणारी चार्मी पासद ही मुंबईत एका खाजगी कंपनीत कामाला होती. तिला दोन भाऊ आणि आई असा परिवार आहे. चार्मी कंपनीत काम करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावत होती. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास डोंबिवली स्थानकातून तिने लोकल पकडली. लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी जास्त असल्याने तिला आत जाता आलं नाही. डोंबिवली कोपर रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलममधून पडून चार्मिचा दुदैवी मृत्यू झाला.
डोंबिवली रेल्वे स्थानकातून डोंबिवली फास्ट लोकल सुरु केली पाहिजे. गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने ठोस उपाययोजना केली पाहिजे.रेल्वे प्रशासन आत्ता या घटनेनंतर काय पावले उचलणार हे पाहावे लागणार आहे.