मुंबई : पावसाची चाहूल लागली असताना शेतकरी खरीपाच्या तयारीमध्ये मश्गुल आहे. मात्र शेतीच्या कामासाठी राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. राज्यातील जिल्हा बँका अडचणीत आहेत आणि त्याचा फटका कर्जवाटपाला बसणार आहे.
खरीप हंगामासाठी राज्य सरकारनं 37 हजार 677 कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दीष्ट ठेवलं आहे. यात राष्ट्रीयकृत बँकांकडून 19 हजार 545 तर खासगी बँकांकडून 2600 कोटींचं कर्जवाटप अपेक्षित आहे.
ग्रामीण बँका 2395 कोटी रुपये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामार्फत 13 हजार 113 कोटी रुपयांचे कर्जवाटप केलं जाणार आहे.मात्र इतकं कर्जवाटप करण्याइतक्या राज्यातल्या जिल्हा बँका सक्षम नाहीत. नोटबंदीनंतर जिल्हा बँकांमध्ये 8 हजार कोटींच्या जुन्या नोटा जमा झाल्यात.