मुंबई : विधीमंडळ नेतेपदी निवड झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. पुन्हा भाजपच्याच नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार येणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, भाजप विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली. चंद्रकांत पाटील यांच्या प्रस्तावाला सुधीर मुनगंटीवारांसह १० आमदारांनी अनुमोदन दिले. विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याची घोषणा केली.
भाजपाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस याच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि मुनगंटीवारांसह १० आमदारांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिले. यावेळी केलेल्या भाषणात फडणवीसांनी मोदी-शाहांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचेही आभार मानले. तसेच भाजपच्या नेतृत्वाखालीच महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे सांगत अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला.
तर दुसरीकडे भाजप-शिवसेनेत सत्तासंघर्ष शिगेला पोहोचलेला असताना शिवसेनेच्या गोटात वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सेना आमदारांची उद्या तातडीची बैठक बोलावली आहे. उद्या सेना भवनात ही बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपासोबत सत्तेत जाण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. तसंच विधीमंडळ पक्षनेतेपदाचीही निवड उद्याच होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राजकीय हालचालींना वेग आल्यामुळे आदित्य ठाकरेंचा कोकण दौराही रद्द करण्यात आला आहे. कोकणातल्या भात शेतीचं नुकसान झाल्यामुळे आदित्य ठाकरे पाहणी करण्यासाठी कोकणाचा दौरा करणार होते.
दरम्यान, राज्यात नवं सरकार बनायचं तेव्हा बनेल असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. तसंच सामनामध्ये आज छापून आलेला अग्रलेख डॅमेज कंट्रोल नसल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे.