NCP च्या भावी CM राजकारणावरुन फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया; हसत म्हणाले, "भावी पंतप्रधान..."

Devendra Fadnavis Comment on Supriya Sule: मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर झळकलेल्या पोस्टर्ससंदर्भात फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं.

Updated: Feb 23, 2023, 03:35 PM IST
NCP च्या भावी CM राजकारणावरुन फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया; हसत म्हणाले, "भावी पंतप्रधान..." title=
sharad pawar supriya sule ajit pawar

Devendra Fadnavis on NCP Politics: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील पॉवर गेम आणि संघर्ष दिवसोंदिवस उघडपणे समोर येत आहे. आज मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले पोस्टर्स (Supriya Sule Banner) झळकले. नाद करायचा नाय अशी ओळ असलेल्या या बॅनवर सुप्रिया यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असण करण्यात आला आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असतील असे पोस्टर्स लागले होते. याच पोस्टरबाजीवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.

हसतच फडणवीस म्हणाले...

मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये पत्रकांरांनी सुप्रिया सुळेंच्या भावी मुख्यमंत्री पोस्टरबद्दल देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस यांनी हसून, "राष्ट्रवादीमध्ये ही पद्धत आहे की ते सांगत असतात भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री अशा अनेक गोष्टी सांगत असतात. पण माझ्या शुभेच्छा आहेत," असं उत्तर देत अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनाही टोला लगावला. अनेकदा शरद पवार यांचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भावी पंतप्रधान असा उल्लेख झाल्याचा संदर्भ फडणवीस यांच्या या विधानाला होता. 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असं कधी कोणाला वाटलं होतं का?

पुढे बोलताना फडणवीस यांनी, "मी माझ्या अनुभवातून शिकलो की कधीही काहीही होऊ शकतं. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असं कधी कोणाला वाटलं होतं का? पण ते झाले. जो जो भावी वाटतो. त्याला त्याला शुभेच्छा," असं हसत म्हटलं. फडणवीस यांचं हे विधान ऐकून पत्रकारही हसू लागले.

अर्धे समजलं अर्धे बाकी

पहाटेच्या शपथविधीसंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता फडणवीस यांनी, "हळूहळू गौप्यस्फोट होत आहेत. मी जे बोललो ते खरं होतं ते तुम्हाला हळू हळू समजत आहे. पण तुम्हाला अर्धे समजलं आहे अर्धे अजून समजायचं आहे," असं म्हटलं.

पवारांची ती अट...

यानंतर पत्रकांनी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाचा संदर्भ देत, बावनकुळे असं म्हणाले की राष्ट्रवादी भाजपाबरोबर यायला तयार होती पण शरद पवारांची अट होती की फडणवीस मुख्यमंत्री नको, असं म्हणत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी, पहाटेच्या शपथविधीवर मी बोललो की समोरुन प्रतिक्रिया येतात. तुम्हाला कळालेल्या गोष्टी या अर्ध्याच असून अर्ध्या गोष्टी अजून समोर आलेल्या नाहीत. मी हळूहळू सगळं समोर आणेन काळजी करु नका, असं सूचक उत्तर दिलं.