Uddhav Thackeray Offered CM Post To Devendra Fadnavis: जून महिन्यात राज्यात घडलेल्या अभूतपूर्वी सत्तासंघर्षासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis:) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीमधील नगरविकासमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे समर्थक आमदारांबरोबर बंडखोरी करुन सुरतला गेले तेव्हा आपल्याला उद्धव ठाकरेंकडून (Uddhav Thackeray) सत्तास्थापनेसंदर्भात विचारणा झाल्याचा दावा फडणवीस यांनी आज 'झी 24 तास'च्या 'ब्लॅक अॅण्ड व्हाइट' या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान केला. फडणवीस यांनी राज्यात झालेल्या सत्तापालटासाठी शिंदेसोबतच्या आमदारांच्या मनात असलेली खदखद कारणीभूत ठरल्याचंही म्हटलं.
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार स्थापन केलं तेव्हा सर्वात चिंतेत असलेल्या व्यक्तींमध्ये एकनाथ शिंदेंचा समावेश होता असं फडणवीस म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊ नका असं उद्धव ठाकरेंना सांगणारे एकनाथ शिंदे होते, असंही फडणवीस म्हणाले. तीन पक्षाचं सरकार चालवणं कठीण होतं. ते चालवायला सक्षम नेतृत्व लागतं. उद्धव ठाकरे एका पक्षाचे नेते आहेत. त्यांच्याकडे पॉलिटीकल असर्टीव्हनेस नाही. महाविकास आघाडीचा कारभार सुरु झाला त्यानंतर शिंदे आणि समविचारी आमदारांचा या सरकारमध्ये जीव गुदमरायला लागला. आपल्या समोर वाताहात होताना त्यांना दिसत होती. इतर दोन पक्ष मोठे होताना त्यांना दिसत होते. त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला मात्र उद्धवजी ऐकण्याच्या तयारीत नव्हते, असं फडणवीस म्हणाले.
यानंतर निलेश खरे यांनी शिंदे यांनी बंड करुन सुरतला जाताना खरोखर तुमच्यात आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाली होती का यासंदर्भातील प्रश्न फडणवीस यांना विचारला. "ज्या वेळेस शिंदे सुरतमार्गे आपल्या आमदारांना घेऊन गुवहाटीला निघाले त्यावेळी उद्धव ठाकरेंनी तुम्हाला संपर्क केल्याचं आम्ही ऐकून आहोत. झालं ते झालं आम्ही तुमच्याबरोबर येतो. आता विस्कटणार नाही एवढं बघा, असं ते म्हणाले त्यावेळेस तुम्ही नकार दिला असं ते सांगतात. किंवा दिल्लीत बोला असं तुमच्याकडून सांगण्यात आलं?" असं निलेश खरे यांनी फडणवीस यांना विचारलं.
या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस यांनी, "संपर्क झाला होता. त्यानंतरही झाला होता. मात्र त्यावेळी मी असं उत्तर दिलं की आम्ही आता खूप पुढे निघून गेलो आहोत. मला त्यावेळी असंही सांगण्यात आलं की जे झालं ते झालं तुम्ही मुख्यमंत्री व्हा. त्यावेळी मी स्पष्टपणे सांगितलं की ती वेळ गेली आहे. मी धोका देणाऱ्यांमधील नाही. आता हे लोक आमच्यासोबत आलेत त्यांना आम्ही तोंडघाशी पाडू शकत नाही. ते लोक बाहेर निघाल्यानंतर, त्यांनी आमच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांना तोंडघाशी पाडणं आमच्या राजकारणात बसत नाही. मी त्यांना स्पष्ट नकार दिला. मी त्यांना सांगितलं, की तुमचं इतर काही असेल तर तुम्ही नक्की वर बोला," असं सांगितल्याचं स्पष्ट केलं.
तुम्ही सांगितलं की बदला घेण्यासाठी तुम्ही हे केलं, असं म्हणत निलेश खरेंनी सूचकपणे फडणवीस यांना बदला या शब्दाचा वापरासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस यांनी, "मला अनेक लोकांनी सांगितलं मला ते पटलं की बदला शब्द योग्य नाही. माझ्या मनात चीड होती. राग प्रचंड होता कारण नुसतं सरकारमधून मला खाली काढलं एवढं नाही. रोज माझा अपमान करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांनी किंवा त्यांच्या सोशल मीडिया टीमने खालच्या स्तरावर जाऊन माझा अपमान केला. जेलमध्ये टाकणं वगैरे मी चिल्लर समजतो. त्याचा मी सामनाही केला असता. अगदी मला किंवा माझ्या कुटुंबाला राजकीय जीवनातून उठवायचं यासंदर्भातील घडामोडी आणि षड्यंत्रं झाली. त्या सगळ्यामुळे मनात राग तर प्रचंड होता. त्यामुळे तो शब्द मी वापरला बदला घेतला. मात्र मागे वळून पाहतो तेव्हा मलाही पटतं की हा शब्द वापरणं योग्य नाही," असं उत्तर दिलं.