आरोग्य विभाग भरती परीक्षांची तारीख ठरली, आरोग्यमंत्र्यांनी केली घोषणा

प्रश्नपत्रिका तयार करणं, एवढीच आरोग्य खात्याची जबाबदारी असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं

Updated: Sep 27, 2021, 06:43 PM IST
आरोग्य विभाग भरती परीक्षांची तारीख ठरली, आरोग्यमंत्र्यांनी केली घोषणा title=

मुंबई : आरोग्य विभाग भरती परीक्षेच्या तारखांची घोषणा अखेर करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. 
येत्या 24 ऑक्टोबरला 'क' गट भरती परीक्षा तर 31 ऑक्टोबरला 'ड' गट भरती परीक्षा होणार आहे. 9 दिवसांपूर्वी हॉल तिकीट दिलं जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. 

रविवार असल्यामुळे शाळा उपलब्ध असतील, त्या अनुषंगाने या तारखा ठरवण्यात आल्या आहेत. डॅशबोर्ड सर्व परीक्षा केंद्रांची माहिती दिली पाहिजे, परीक्षार्थी विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली पाहिजे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. 

अफवेवर विश्वास ठेवू नका

कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, मोठ्या भरतीची परीक्षा असेल, तर त्यामध्ये अनेक वावड्या उठवल्या जातात किंवा काही जण चुकीचं काम करतात, त्यावर अत्यंत कठोर कारवाई व्हावी, अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. यानंतरही अशा स्वरुपाची कोणी मागणी केली, काही गैरमार्गाचा वापर करण्यात आला तर त्या विद्यार्थ्याने किंवा पालकांनी संबंधित पोलीस स्थानकात तक्रार दाखल करावी. असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. परीक्षा पारदर्शी व्हाव्यात, यामध्ये कोणतीही गडबड होणार नाही याची काळजी आम्ही घेत असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

आरोग्य खात्याची जबाबदारी 

न्यासा नावाची जी संस्था आहे ती संस्था आरोग्यविभागाकडून ठरवण्यात आलेली नव्हती. माहिती आणि तंत्रज्ञान विभाग याबाबतची निवड करत असते, त्यामुळे त्याबाबतचा जो काही निर्णय घ्यायचा असेल, तो त्या विभागाने घ्यावा, प्रश्नपत्रिका तयार करणं, एवढीच आरोग्य खात्याची जबाबदारी असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

ऑडिओ क्लिपची सत्यता काय?

आरोग्य विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्याबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना खात्री देऊ इच्छितो की अत्यंत पारदर्शी पद्धतीने परीक्षा घेण्याचा आमचा निर्णय आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या ऑडिओ क्लिप्स असतात त्यातली तथ्यता पोलीस तपासतील, आणि आम्हाला नावं कळली तर आम्ही तक्रार देऊ, आम्ही अमरावती आणि पुणे एसपीला पत्र देऊन कळवलं आहे, असंही राजेश टोपे म्हणाले.

भरती परीक्षेत घोटाळा?

आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गाच्या भरतीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी केला आहे. परीक्षेत पास करण्यासाठी एजंट 15 लाखांची मागणी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परीक्षा घेण्याचं कंत्राट न्यासा कंपनीकडे देण्यात आलं आहे. एजंटही न्यासा कंपनीचा उल्लेख करत असल्याचं ऑडिओ क्लिप स्पष्टपणे ऐकायला येतंय. ही क्लीप अमरावतीची असल्याचा दावा शेंडगे यांनी केला आहे. आता या प्रकरणाची सीआयडी चौकशी करून सत्य समोर आलं पाहिजे अशी मागणी शेंडगे यांनी केली आहे.