आझादांची सभा होऊ न दिल्याने दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांचा रास्तारोको

भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील कार्यक्रमला परवानगी नाकारल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 

Updated: Dec 29, 2018, 11:34 PM IST
आझादांची सभा होऊ न दिल्याने दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांचा रास्तारोको  title=

मुंबई : भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील कार्यक्रमला परवानगी नाकारल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याचा निषेध म्हणून दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला आहे. पुर्व द्रुतगती मार्गावर संतप्त कार्यकर्त्यांचे रास्तारोको आंदोलन सुरू आहे. आझादांची सभा होऊ न दिल्याचा निषेध या ठिकाणी व्यक् केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे. चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील कार्यक्रमांना देखील आतापर्यंत परवानगी मिळालीच नसल्याचे समोर आले आहे. भीम आर्मीतर्फे ३० डिसेंबरला कोरेगाव भीमा संघर्ष सभेचं आयोजन करण्यात आले आहे. पुण्यात आयोजित केलेल्या सभेलाही अजूनपर्यंत पोलीस परवानगी मिळालेली नाही. तसेच आज सकाळी चंद्रशेखर यांना मालाड येथील एका हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आल्यानेही कार्यकर्ते संतप्त झाले होते. त्यांनी हॉटेल बाहेर घोषणाबाजी केली. त्यावेळी पोलिसांसोबत कार्यकर्त्यांची बाचाबाचीही झाली.

संघर्ष चिघळणार 

 ३१ डिसेंबरला चंद्रशेखर आझाद हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंबेडकरवादी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होते. मात्र विद्यापीठाकडून या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही कार्यक्रम घेण्यावर भीम आर्मीचे स्थानिक कार्यकर्ते ठाम आहेत. त्यामुळे या ठिकाणी संघर्ष चिघळ्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.

शौर्यदिन पोलीस बंदोबस्तात

1 जानेवारीच्या शौर्यदिनी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून राज्यभरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. भीम आर्मीच्या 15 कार्यकर्त्यांना काल शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.विजय दिनाच्या निमित्तानं कोरेगाव-भीमामध्ये १० लाख लोक येतील असा अंदाज बांधला जात आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तब्बल ५ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या १२ तुकड्या, १२०० होमगार्ड, २००० स्वयंसेवक आणि ५२० पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी यासंदर्भात माहिती दिली.