सिगारेट दिले नाही उधार, ग्राहकाने दिला बांबूचा मार

ग्राहकाने केलेल्या मारहाणीत दुकानदार जखमी झाला आहे. केवळ सिगारेट उधार द्यायला नकार दिल्याच्या कारणावरून साकिनाका येथे हा प्रकार घडला. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली असून, तपास सुरू केला आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 18, 2017, 08:27 PM IST
सिगारेट दिले नाही उधार, ग्राहकाने दिला बांबूचा मार title=

मुंबई : ग्राहकाने केलेल्या मारहाणीत दुकानदार जखमी झाला आहे. केवळ सिगारेट उधार द्यायला नकार दिल्याच्या कारणावरून साकिनाका येथे हा प्रकार घडला. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली असून, तपास सुरू केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, विजयबहादूर राजपूत यादव असे दुकानदाराचे नाव आहे. साकीनाका येथील संघर्ष नगरमध्ये कम्युनिटी हॉल शेजारील आपल्या दुकानात तो नेहमी प्रमाणे काम करत होता. दरम्यान, शनिवारी सकाळी ८.३०च्या सुमारास एक अनोळखी इसम (ग्राहक) त्याच्या दुकानावर आला. त्याने विजयबहादूरला सिगारेट उधार मागितले. त्यास विजयबहादूरने नकार दिला. तरीही ग्राहकाने हट्ट कायम ठेवला. पण, त्याने त्याला नकारच दिला.

अनेकदा आग्रह करूनही दुकानदार सिगारेट उधार देत नाही, हे पाहून ग्राहकाने अचानकपणे राजपूतवर हल्ला चढवला. त्याला बांबूने मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत विजयबहादूरच्या डाव्या हाताला आणि डोक्याला जबर मार लागला. त्याच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, रायबहादूरनेही मारहाणीचा विरोध करत ग्राहकाला प्रत्यूत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने पळ काढला.

साकीनाका पोलिसांनी पळून गेलेल्या अज्ञात आरोपीविरोधात भादंवि कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.