मंदिर उघडून संक्रमण वाढल्यास पुन्हा दोष सरकारला द्याल- राऊत

मंदिर उघडण्याची मागणी करणाऱ्यांनी थोडा संयम बाळगा असे आवाहन 

Updated: Aug 17, 2020, 03:07 PM IST
मंदिर उघडून संक्रमण वाढल्यास पुन्हा दोष सरकारला द्याल- राऊत title=

मुंबई : राज्य अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत असून दुकानं, मॉल्स उघडण्यात आलेयत. या पार्श्वभुमीवर राज्यातील मंदिर देखील उघडावीत अशी मागणी होत आहे. या पार्श्वभुमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्वाचं विधान केलंय. मंदिर उघडल्यावर संक्रमण वाढल्यावर पुन्हा दोष तुम्ही सरकारला देणार असे राऊत म्हणाले. त्यामुळे मंदिर उघडण्याची मागणी करणाऱ्यांनी थोडा संयम बाळगा असे आवाहन राऊत म्हणालेयत.

धार्मिक स्थळं उघडायला हवीत परंतु धार्मिक स्थळं उघडल्यानंतर झुंबड उडाली तर काय? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. या संदर्भात एक नियमावली ठरवावी लागेल, मी सरकारशी बोलतो. कारण मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत दोन दिवस द्या असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणालेयत.राज्यातील मंदिरं खुली करण्यात यावी यासाठी त्र्यंबकेश्वर येथील महंत राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कृष्णकुंजवर आले होते.

कम्पाऊंडरविषयीच्या विधानाने संजय राऊतांवर सध्या टीका होतेय. त्यावर देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. मी डॉक्टरांचा कोणताही अपमान केलेला नाही. शाब्दिक कोटी आणि अपमान यांच्यातला फरक आपल्याला कळायला हवा, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत यांनी नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंपाऊडरला डॉक्टरपेक्षा जास्त ज्ञान असते, अशा आशयाचे विधान केले होते. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर डॉक्टरांच्या काही संघटना आक्रमक झाल्या होत्या. 

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, डॉक्टरांवर संकट आली आहेत तेव्हा व्यक्तीश: मी मदतीला गेलोय.  एका विशिष्ट राजकीय विचाराची लोक मोहिम चालवत असतील तर योग्य नाही. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून कोटी झालीय. डॉक्टरांचा बहुमान आहे की, कंपाऊंडरला त्यांनी इतकं निष्णात केले आहे. कंपाऊंडरचा सन्मान केला म्हणून काही डॉक्टरांनी टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

याप्रकरणात मी माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही माझ्या विधानाचा अर्थच समजवून घेत नाही. बोलण्याच्या ओघात डॉक्टरांविषयी शाब्दिक कोटी झाली. यामुळे कोणाचा गैरसमज झाला असेल तर दूर करावा, मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे, असेही राऊत यांनी म्हटले.

तसेच मी जागतिक आरोग्य संघटनेबाबत WHO केल्या वक्तव्याचा आपल्याकडे निषेध होण्याचे कारण नाही. जागतिक पातळीवरील अनेक नेत्यांनी WHO ला फटकारले आहे. सध्या WHO ही राजकीय संघटना झालीय, एका देशाची बटीक झालीय. WHO कोरोना प्रसारास कारणीभूत असल्याचा आरोप अनेक देशांनी केल्याचे राऊत यांनी सांगितले.