Covid 19 Cases : देशात कोरोना रुग्ण संख्येने वाढवली चिंता, पंतप्रधानांनी बोलवली बैठक

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा मास्कची सक्ती करण्यात येणार का?

Updated: Apr 26, 2022, 08:53 PM IST
Covid 19 Cases : देशात कोरोना रुग्ण संख्येने वाढवली चिंता, पंतप्रधानांनी बोलवली बैठक title=

मुंबई : देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. देशात सलग सातव्या दिवशी कोरोनाचे 2 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2,483 नवीन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, कर्नाटकचे आरोग्य मंत्री के सुधाकर म्हणाले की, जूनच्या अखेरीस कोरोनाची चौथी लाट शिगेला पोहोचू शकते.

दुसरीकडे महाराष्ट्रात ही बंदिस्त ठिकाणी पुन्हा मास्कची सक्ती होण्याची शक्यता आहे. अन्य राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. त्यावेळी टास्क फोर्समधील बहुतांश डॉक्टरांनी मास्कबाबत फेरविचार करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या दुपारी पंतप्रधानांसोबत सर्व मुख्यमंत्र्यांची व्हीसी होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्री सर्व जिल्हाधिका-यांशी संवाद साधणार आहेत. 

आयआयटी कानपूरच्या अभ्यासाचा संदर्भ देत ते म्हणाले की, त्याचा प्रभाव ऑक्टोबरपर्यंत राहील. हे लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने राज्यात फेस मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य केले आहे.

देशातील वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दुपारी 12 वाजता सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत. गेल्या एका आठवड्यापासून देशात दोन हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. सर्वात मोठी चिंता राजधानी दिल्लीची आहे, जिथे दररोज 1 हजारांहून अधिक केसेस येत आहेत.

देशातील कोरोनाची सक्रिय प्रकरणे 15,636 वर गेली आहेत, तर पॉझिटिव्हीटी रेट 0.55% वर आला आहे. दुसरीकडे, IIT मद्रासमध्ये 32 नवीन कोरोना रुग्ण आढळल्यानंतर एकूण संख्या 111 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात रिकव्हरी केसेसची संख्या 1,970 झाली आहे.

देशात कोरोनामधून बरे होणाऱ्यांची संख्या ४,२५,२३,३११ झाली आहे. रिकव्हरी रेट 98.75% आहे. ICMR नुसार, काल भारतात 4,49,197 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण 83,54,69,014 नमुना चाचण्या झाल्या आहेत.