कोरोना रुग्ण वाढू लागल्याने मुंबई लोकलबाबत २२ फेब्रुवारीनंतर फेरविचार

मुंबईतल्या लोकलसेवेचा २२ फेब्रुवारीनंतर फेरविचार करण्यात येणार आहेत.

Updated: Feb 16, 2021, 10:06 PM IST
कोरोना रुग्ण वाढू लागल्याने मुंबई लोकलबाबत २२ फेब्रुवारीनंतर फेरविचार title=

मुंबई : मुंबईतल्या लोकलसेवेचा २२ फेब्रुवारीनंतर फेरविचार करण्यात येणार आहेत. लोकलसेवा सुरू झाल्यावर दोन आठवड्यात रूग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. त्यामुळे महापालिकेने २२ फेब्रुवारीला लोकलसेवेबाबत आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबईत जानेवारी महिन्यात रुग्ण संख्या वाढू लागली आहे. दिवसाला सरासरी ३०० ते ३५० रुग्ण वाढ होत होती. पण आता हा आकडा ६५० पर्यंत पोहोचला आहे. मुंबईत लोकल सर्वांसाठी सुरु केल्यानंतर १५ दिवसांनी निरीक्षणांचा कालावधी आहे. जो २१ फेब्रुवारीला संपत असल्याने २२ फेब्रवारीला महापालिका आढावा घेणार आहे.

२२ फेब्रुवारीपर्यंत रुग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर लोकलबाबतचा निर्णय हा बदलला जावू शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षावर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईसह इतर शहरांमध्ये कोरोना रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या रुग्ण संख्येत विदर्भात झपाट्यानं वाढ होतेय. त्यात अकोला, अमरावती, यवतमाळ या शहराचा समावेश आहे. अकोल्यात गेल्या आठवडाभरात पाचशेच्या वर रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे अकोलेकरांची चिंता वाढलीय.कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी काही नवीन नियमावली तयार करण्यात आलीय.ही नियमावली 28 फेब्रुवारी पर्यंत राहणारे आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूरमध्ये ही रुग्ण संख्या वाढत असल्याने आता या शहरांमध्ये काय निर्णय होतो हे पाहावं लागेल. पण काल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियम न पाळल्यास कडक निर्बंधाचा इशारा दिला आहे.