दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोना लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन:श्च हरी ओम म्हणत मिशन बिगीन अगेनची घोषणा केली. यानंतर आता ७५ दिवसांनी सोमवारपासून पुन्हा एकदा खासगी ऑफिस सुरू होणार आहेत. असं असलं तरी ऑफिससाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे.
१० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारपासून ऑफिस सुरू होणार आहेत. ज्या ऑफिसमध्ये १० किंवा त्यापेक्षा कमी कर्मचारी असतील, तिथे सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसंच ज्या ऑफिसमध्ये १० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात, तिकडे १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी असेल. तसंच उरलेल्या कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करावं, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावण्यापूर्वी ऑफिसचं सॅनिटायझेशन करावं लागणार आहे, तसंच कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये मास्क घालणंही बंधनकारक असणार आहे.
मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्य सरकारने खासगी ऑफिस सुरू करायला परवानगी दिली आहे. कामाच्या ठिकाणी सगळी जबाबदारी घेण्याच्या सूचनाही सरकारने केल्या आहेत. याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना आठवड्यातला एक दिवस कामावर उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे. एकही दिवस कामावर हजर न राहणाऱ्या सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा संपूर्ण आठवड्याचा पगार कापला जाईल, असा इशारा सरकारने आधीच दिला आहे.