काँग्रेस-राष्ट्रवादीचा निर्णय, लोकसभा-विधानसभा निवडणुकीत महाआघाडी

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाआघाडी करण्याचा निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत घेण्यात आलाय.

Updated: Sep 11, 2018, 10:53 PM IST
काँग्रेस-राष्ट्रवादीचा निर्णय, लोकसभा-विधानसभा निवडणुकीत महाआघाडी title=

मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाआघाडी करण्याचा निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत घेण्यात आलाय. जागा वाटपाची बोलणी महाआघाडी केल्यानंतर सुरू करणार असल्याचंही बैठकीत ठरलंय. समविचारी पक्षांशी बोलणी करून त्यांना महाआघाडीत समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. 

आगामी निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह काही प्रमुख नेते उपस्थित होते. 

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडीसाठी बैठक झाली. मात्र, जागा वाटपावरुन तिढा असल्याने या बैठकीला निर्णय होऊ शकला नाही. दमरम्यान, भाजपला शह देण्यासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी करण्यासाठी एकमत दिसून आले. महाआघाडी करण्यावर भर देण्यात आलाय.

या बैठकीत काय निर्णय होतो, याची उत्सुकता होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपावर चर्चा ही महाआघाडीनंतर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जागा वाटपाबाबत निर्णय तुर्तास पुढे ढकलण्यात आलाय.