मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का; 'हा' आमदार शिवसेनेच्या वाटेवर?

शिवसेनेने त्यांना मालाड पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्याची तयारीही दर्शविली आहे. 

Updated: Jul 26, 2019, 06:42 PM IST
मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का; 'हा' आमदार शिवसेनेच्या वाटेवर? title=

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना मोठे धक्के बसले आहेत. दोन्ही पक्षांमधील बड्या नेत्यांच्या पक्षांतरामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. 

यामध्ये आता काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांची भर पडली आहे. ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेने त्यांना मालाड पश्चिममधून उमेदवारी देण्याची तयारीही दर्शविली आहे. 

आमदार अस्लम शेख हे १९९९ ते २००४ समाजवादी पार्टी व २००४ ते २००९ या काळात काँगेसचे नगरसेवक होते. तसेच २००९ आणि २०१४ मध्ये ते मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. 

दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईतील चेहरा असणाऱ्या सचिन आहिर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. 

यापैकी काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर आणि राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड हे ३० जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोळंबकर मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत.

नारायण राणे यांचे कट्टर समर्थक असणारे कालिदास कोळंबकर २००५ साली शिवसेनेतून बाहेर पडले होते. राणेंसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कोळंबकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील सख्य गेल्या काही महिन्यांमध्ये वाढले होते. त्यामुळे कालिदास कोळंबकर यांचा भाजपप्रवेश निश्चितच मानला जात होता.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव पिचड हेदेखील मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पिचड घराणे शरद पवार आणि राष्ट्रवादीशी एकनिष्ठ होते.