...तर उद्धव ठाकरेंना 'मंत्रीकपात' करावी लागेल, संजय राऊतांचा सूचक इशारा

काही मंत्र्यांनी तीन महिने मुंबईचे तोंडच पाहिलेले नाही

Updated: May 24, 2020, 11:19 AM IST
 ...तर उद्धव ठाकरेंना 'मंत्रीकपात' करावी लागेल,  संजय राऊतांचा सूचक इशारा title=

मुंबई : 'मंत्रालयात, सरकारी कचेऱ्यातील शांतता एक प्रकारची हतबलताच दाखवत आहे. असेच राहिले तर कामगार कपातीप्रमाणे 'मंत्रीकपात' करण्याच मुख्यमंत्र्यावर वेळ येईल' असं सूचक विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनातून केलं आहे. 

महाराष्ट्राचे सगळेच मंत्री आपापल्या जिल्ह्यात 'कोरोना'च्या लढाईत जुंपले आहेत. मात्र काही मंत्र्यांनी तीन महिने मुंबईचे तोंडच पाहिलेले नाही. या मंत्र्यांवर कठोर कारवाई करत 'मंत्रीकपात' करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल असं विधान संजय राऊतांनी करून त्या मंत्र्यांना इशारा दिला आहे. 

राजकारण बंद करा व लोकांच्या प्रश्नांकडे पहा. ही राजकारण करण्याची वेळ नाही हे समजून घेतले पाहिजे. 'ठाकरे सरकार' कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरल्याची घंटागाडी वाजवत विरोधी पक्ष पुन्हा पुन्हा राजभवनाची पायरी चढत आहे. आंदोलनही करत आहे. अपयशाचे म्हणावे तर कोरोनाच्या बाबतीत सगळ्यात अपयशी राज्य म्हणून उत्तर प्रदेश आणि गुजरातकडे पाहावे, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. 

शरद पवारांनी मोदींना पत्र पाठवले. पत्रातून शेतकऱ्यांना मदत करण्याचे सुचवले. यावर विरोधी पक्षनेते फडवणवीस मात्र भडकले. पवारानी एक पत्र मुख्यमंत्र्यांनाही लिहावे असा त्रागा त्यांनी केला. पवारांनी मोदींना पत्र लिहिले हा त्यांचा अनुभव. मग विरोधी पक्षनेते असलेल्या फडणवीसांना मोदींना पत्र लिहिण्यापासून कोणी रोखले?  फडणवीस व त्यांचे सहकारी राज्यपाल, पंतप्रधानांशी बोलतात ते फक्त सरकारच्या अपयशाबाबत. राज्य सरकार बरखास्त करा हाच एकमेव त्यांचा कार्यक्रम आहे. असा टोला देखील राऊतांनी लगावला आहे.