मुंबई : राज्यातल्या बळीराजाला सरसकट आणि संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. त्यासाठी त्यांनी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची काल बैठक देखील घेतली आणि अधिकाऱ्यांना तयारीच्या सूचना दिल्यायत. या बैठकीला छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील उपस्थित होते.
कर्जमाफीसाठी राज्याला ३५ हजार ८०० कोटींची गरज आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा शब्द मुक्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्याबाबत आर्थिक परिस्थितीचा आढावा कालच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्यातील शेतकरी मागील पाच वर्षात दुष्काळ आणि अतिवृष्टीने होरपळून निघाला आहे. फक्त शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकरी कुटूंबांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.
भाजपा सरकार कर्जमाफी करेल अशी मोठी आशा शेतकऱ्यांना होती, पण फार मोजक्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, यात महाराष्ट्र विकास आघाडी कर्जमाफीचा निर्णय घेणार असल्याने शेतकऱ्यांना निर्णयाने दिलासा मिळणार आहे, आणि जेव्हा सातबारा कोरा होईल तेव्हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आनंद होणार आहे.