मुंबई : अर्थसंकल्पाने मुंबई आणि महाराष्ट्रावर पुर्ण अन्याय केल्याची टीका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि वास्तवाचे भान हरपून देशातील युवा, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा असल्याचे ते म्हणाले.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पुन्हा नव्याने मांडली असून केवळ स्वप्नरंजन केल्याचे ते म्हणाले. १५ लाख शेतकऱ्यांचे कृषी पंप सोलरवर आणण्याचे आश्वासन दिले. कार्बन उत्सर्जन कमी करणारे थर्मल पॉवर बंद करणार असल्याचे सांगितले. पण नेमक्या या गोष्टी कधी पूर्ण होणार ? थर्मल पॉवर बंद केल्याने निर्माण होणारी वीजेची तूट कशी भरून काढणार ? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाला, मेट्रोला अपेक्षित असलेले अर्थबळ या अर्थसंकल्पातून दिले नसल्याचे ते म्हणाले. मुंबईकरांची लाईफ लाईन असलेल्या रेल्वे लाईनच्या विकासाचा कुठलाही उल्लेख अर्थसंकल्पात नाही. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या जुन्याच उल्लेखांशिवाय या अर्थसंकल्पाने राज्यातील रेल्वे विकासाला कोणतीही गती दिलेली नसल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.