जर राज्य सरकारने महात्मा फुलेंवर असा सिनेमा बनवला, तर त्यातील ''सत्याचा शोध'' घ्यावा लागेल

राज्य सरकार तयार करत असलेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील चित्रपट निर्मिती होण्याआधीच वादात आला आहे. 

Updated: Aug 12, 2021, 07:36 PM IST
जर राज्य सरकारने महात्मा फुलेंवर असा सिनेमा बनवला, तर त्यातील ''सत्याचा शोध'' घ्यावा लागेल title=

दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : राज्य सरकार तयार करत असलेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील चित्रपट निर्मिती होण्याआधीच वादात आला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील चित्रपटाच्या पटकथा आणि संहितेला सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीचा आक्षेप आहे. निर्मात्याने सादर केलेल्या पटकथेत काल्पनिक घटनांचा मारा केल्याच सांगण्यात येत आहे. सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीतील सदस्य पंढरीनाथ सावंत, सदानंद मोरे आणि हरी नरके यांचा पटकथा आणि संहितेला आक्षेप आहे.

पटकथेत काल्पनिक गोष्टींचा मारा न करता ऐतिहासिक सत्यता काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना तज्ज्ञ समितीकडून करण्यात आल्या आहेत. शासनाला सादर केलेल्या पटकथा आणि संहितेचे फेरलेखन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फेरलेखन करण्याच्या सूचना समितीने दिल्या आहेत. पटकथा आणि संहितेचे फेरलेखन झाल्यानंतर पुढील बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्य सचिव देखील उपस्थित होते.

महात्मा फुले यांच्यावरील चित्रपट निर्मितीचे काम परप्रांतीय व्यक्तीच्या हाती दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. प्रांतवाद वाटू शकतो, पण वास्तवापासून चित्रपट भरकटत असल्याचं दिसून येत आहे, म्हणूनच की काय काल्पनिक घटनांचा मारा कथानकात वाढला आहे.

पण महाराष्ट्रातील मराठी निर्मात्याच्या हाती हा सिनेमा आला असता, तर अशा अडचणी आल्या नसत्या, तसेच महात्मा फुले यांचं कथानक वास्तवापासून भरकटले नसते असं म्हटलं जात आहे. एलोकन्स मिडिया लि. या कंपनीला चित्रपट निर्मितीचे काम देण्यात आले आहे, ऐश्वर्या यादव त्याच्या प्रमुख आहेत.