चिंचपोकळी गणेश मंडळांचे अरेरावीवर स्पष्टीकरण; म्हणाले, एका महिलेवर...

चिंचपोकळी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून गणेशभक्तांना बेदम मारहाण करण्यात आली

Updated: Sep 4, 2022, 06:10 PM IST
चिंचपोकळी गणेश मंडळांचे अरेरावीवर स्पष्टीकरण; म्हणाले, एका महिलेवर... title=

मुंबई : मुंबईच्या प्रसिद्ध चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या (chinchpokli sarvajanik utsav mandal) कार्यकर्त्यांकडून गणेशभक्तांना मारहाण (ganeshotsav 2022) करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. शनिवारी मोठ्या प्रमाणात गणेशभक्त लालबाग परिसरात गणपतींचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी चिंचपोकळी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून गणेशभक्तांना बेदम मारहाण करण्यात आली.

लालबाग, चिंचपोकळी भागात शनिवारी रात्री लाखो गणेशभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी गर्दी नियंत्रण करताना चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेश भक्तांना मारहाण केली. मंडपाच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या बॅरिकेडला ढकलून शेकडो भाविकांचा लोंढा आत येत होता. त्यावेळी भाविकांना मारहाण करण्यात आल्याचे व्हिडीओमध्ये समोर आलं आहे.

दरम्यान आता चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने भाविकांना झालेल्या हाणामारी प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. मंडळाचे अध्यक्ष विद्याधर घडी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

"एका महिलेच्या दागिन्यावर हात टाकणाऱ्या समाजकंटकाला पकडताना त्यावेळी झटापट झाली. त्यानंतर त्या माणसाला कार्यकर्त्यांनी मारलं. आमचे कार्यकर्ते सेवा देत होते. त्यांनी कोणत्याही भाविकांसोबत हाणामारी केली नाही. प्रचंड गर्दी असल्याने तो समाजकंटक कुठेही पळून जाण्याची शक्यता होती. तसेच त्याला पोलिसांपर्यंत घेऊन जाता येत नव्हतं," असं मंडळाच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे.

"फक्त त्या एकाच व्यक्तीला पकडायचा प्रयत्न होता. बाकी कोणालाही हाणामारी झालेली नाही. यासंदर्भात आज मंडळाची बैठक होणार आहे. तसेच असं पुन्हा होणार नाही याचं नियोजन करण्यात येणार आहेत. यासोबत सुरक्षाव्यवस्थाही वाढवण्यात येणार आहे," असेही मंडळाचे अध्यक्ष विद्याधर घडी म्हणाले.