मुंबई : देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Corona Vaccination) मोहिम वेगाने सुरु आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीचे 96 कोटीहून अधिक डोस दिले गेले आहेत. आज एका दिवसात 32 लाखाहून अधिक डोस देण्यात आले. लसीकरणाचा वेग पाहता देश पुढील आठवड्यापर्यंत लसीच्या 100 कोटी डोसचा (Vaccine Dose) आकडा गाठेल असा अंदाज वर्तवला जात आहे. (India set to reach 100 crore vaccine doses mark next week)
केंद्र सरकारने या टप्प्यासाठी विशेष तयारी केली आहे. ज्यावेळी भारतात 100 कोटी डोसचा (Corona Vaccine Dose) आकडा पूर्ण होईल त्यावेळी देशातील सर्व रेल्वे स्थानकं, विमानतळ, बस डेपो आणि सार्वजनिक ठिकाणी एकाचेवळी याची घोषणा केली जाईल. याशिवाय समुद्र किनारे आणि जहाजांवर या यशस्वी टप्प्याचं (Milestone) सेलेब्रेशन केलं जाणार आहे.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये 18 ते 44 वयोगटातील तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु असून आतापर्यंत 38,99,42,616 लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर याच वयोगटात 10,69,40,919 लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. या आकडेवारीनुसार देशातील एकूण लोकसंख्येच्या 30 टक्के लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.
दरम्यान, लहान मुलांच्या लसीकरणाबाबत तज्ज्ञांचं मत घेतलं जात आहे. तज्ज्ञांच्या मते लहान मुलांच्या लसीकरणाबाबत सध्या आवश्यक काळजी घेण्याची गरज आहे.
देशात लसीची कमतरता भासणार नाही असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. पुढच्या महिन्यापर्यंत आवश्यकतेपेक्षा जास्त डोस उपलब्ध होतील आणि देशातील लसीकरण पूर्ण झाल्यानंतर जे डोस उरतील ते इतर देशात पाठवले जातील असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. भारताने आतापर्यंत नेपाळ, बांग्लादेश, इराण, म्यानमार या सारख्या देशांना 10 लाख कोरोना डोस पुरवले आहेत.