विरार : विरार पश्चिमेकडील एसटी आगरातून मुंबईसाठी निघालेली बस, सकाळी नऊ वाजता मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार फाट्याजवळ अचानक बंद पडली. बस बंद पडल्याने बसमधील प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
आधीच बसच्या कमतरतेमुळे प्रवाशांना मुंबई प्रवासासाठी तासनतास रांगेत तात्कळत उभं राहावं लागत. अनेकांना लेटमार्क लागतो. त्यात शनिवारी बस बंद झाल्यामुळे कामासाठी निघालेल्या प्रवाशांना बराच वेळ महामार्गावर दुसऱ्या वाहनांच्या प्रतीक्षेत थांबावं लागलं. नंतर मात्र मागून येणाऱ्या एसटी बसमधून या प्रवाशांना मुंबईसाठी पाठवण्यात आलं. मात्र ती बस आधीच भरली असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
मागील जवळपास पाच महिन्यांपासून मुंबईची लोकल सेवा बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना लोकलमधून प्रवासाची मुभा आहे. त्यामुळे इतर लोकांना कामासाठी मुंबईत येताना बसने प्रवास करावा लागत आहे. महाराष्ट्रात अनेक गोष्टी टप्प्या-टप्प्याने अनलॉक होत असताना लोकल मात्र अद्यापही सर्वांसाठी सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व भार बस सेवेवर पडतो आहे. मात्र बस वेळेत न येणं, बसची कमतरता, एका बससाठी असणारी मोठी रांग, वाहतूक कोंडी याचा चाकरमान्यांना मोठा फटका बसतो आहे. त्यामुळे मुंबईची लाईफ लाईन मानली जाणारी लोकल कधी सुरु होणार हाच प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.