प्रशांत अंकुशराव, मुंबई : सध्या सरकारी कर्मचारी असल्याचं भासवून विविध सवलती लाटणाऱ्यांचं पेवच फुटलं आहे. बोगस सरकारी ओळखपत्राचा केवळ पट्टा लटकावून अनेकजण फिरताना दिसत आहेत. या बोगस सरकारी कर्मचाऱ्यांमुळं देशाची सुरक्षा कशी धोक्यात येऊ शकते.
40 रुपये द्या आणि सरकारी कर्मचारी व्हा
महाराष्ट्र शासन, मंत्रालय, बृहन्मुंबई महानगरपालिका, भारतीय रेल्वे, इंडियन नेव्ही... असा उल्लेख असलेल्या बोगस ओळखपत्रांच्या पट्टा गळ्यात घातला की, तुम्ही झालात सरकारी कर्मचारी. हा पट्टा घाला आणि मुंबईत कुठंही बिनधास्त फिरा, मंत्रालयात जा, महापालिकेत जा, रेल्वेनं प्रवास करा. अवघ्या 40 रुपयांत छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसच्या आवारात या अनधिकृत पट्ट्या खुलेआम विकल्या जात आहेत.
ही बोगस ओळखपत्राची पट्टी कुणीही खरेदी करू शकतं. यामुळं मुंबईची सुरक्षा पुन्हा एकदा धोक्यात येऊ शकते. पण त्यावर कुणाचंही नियंत्रण नाही. मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला किंवा दिल्लीत संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या वेळी अशीच बोगस ओळखपत्रं तयार करण्यात आली होती, याचा विसर बहुधा सुरक्षा यंत्रणांना पडलेला दिसतो आहे.
ज्या ठिकाणी या पट्ट्या विकल्या जातात, तिथून हाकेच्या अंतरावर सरकारी अधिकाऱ्यांची ऑफिसेस आहेत. पण जोवर मोठी घटना होत नाही तोवर प्रशासन जागं होत नाही. या पट्ट्या खुलेआम विकणाऱ्यांवर सरकार, पोलीस आणि महापालिका कधी कारवाई करणार?