कृष्णात पाटील, मुंबई : मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना विरुद्ध आयुक्त वादाला नवं वळण लागलं आहे. शिवसेनेत आयुक्तांविरोधातील मतात एकमत नसल्याचं पुढे आलं आहे. महापालिकेतील शिवसेना नेत्यांमधील ही गटबाजी उघड झाली आहे. महापौर विरुद्ध प्रशासन या वादानंतर शिवसेनेच्या महापालिकेतील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. महापौर विरुद्ध आयुक्त राड्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी वेगळीच भूमिका मांडली.
'उद्धटपणे उत्तरे देणाऱ्या महापालिका आयुक्तांना परत पाठवा ही शिवसेना पक्षाची भूमिका नाही, पक्ष अशी मागणी करणार नाही असं स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हटलं आहे. महापालिका आयुक्तांना परत पाठवण्याची मागणी सभागृह नेत्या आणि महापौरानी केली हे त्यांचं स्वत:चं मत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
शिवसेना पक्षाचा या विधानाशी संबंध नाही, ही शिवसेनेची भूमिका नाही.' असं देखील जाधव यांनी म्हटलं आहे.
'महापौर ठिय्या आंदोलनाला बसल्या त्या महापौर म्हणून नाही तर विभागाच्या नगरसेविका म्हणून बसल्या होत्या. पक्ष म्हणून आयुक्तांना परत पाठवण्याची मागणी शिवसेना करत नाही. ही महापौर आणि सभागृह नेत्यांची वैयक्तिक भूमिका आहे. प्रशासनावर सत्ताधारी म्हणून सेनेचा वचक आहेच.' असं देखील यशवंत जाधव यांनी म्हटलंय.
दुसरीकडे महापालिकेचे आयुक्त चहल यांनी याबाबत माफी देखील मागितली आहे. मला लहान भाऊ समजून माफ करा. असं आयुक्त इकबालसिंह चहल यांनी महापौर आणि सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना फोन करुन म्हटलं आहे. तर लहान भावानंही इथुन पुढे मोठ्या बहिणींचं ऐकावं असं सांगत महापौर आणि विशाखा राऊत यांनी देखील वादावर पडदा पाडला. हा वाद शिवसेना आणि आयुक्त यांच्यासाठी आता मिटला असला तरी यावरुन विरोधकांना टीका करण्याची संधी मिळाली आहे.
महापौर आणि प्रशासनातला वाद हे चित्र विदारक आहे. महापालिकेतील सत्ताधारी पक्ष विकलांग, महापौर हतबल आणि प्रशासन उद्दाम असं चित्र आहे. सत्ताधा-यांचा प्रशासनावर वचक नसल्याचं हे द्योतक असल्याचं भाजपचे नेते प्रभाकर शिंदे यांनी म्हटलं आहे. माफी मागितली गेली असेल तरी, जो हौद से गयी वो बुंद से नहीं आती. महापौरांच्या अपमानाला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करा. अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.