भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना शहीद मेजर राणेंच्या वीर मरणाचा विसर

मिरारोडमध्ये एका नगरसेवकाच्या बर्थडे पार्टीचा जल्लोष सुरु होता. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना शहीद मेजर राणेंच्या वीर मरणाचा विसर पडल्याचे दिसून आले.

Updated: Aug 8, 2018, 11:59 PM IST
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना शहीद मेजर राणेंच्या वीर मरणाचा विसर title=

वसई : मिरारोडचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांना शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना आलेल्या वीर मरणाचा विसर पडला आहे. मंगळवारी एकीकडे शहीद मेजर राणे यांना देशभरातून आदरांजली वाहण्यात येत होती तर मिरारोडमध्ये एका नगरसेवकाच्या बर्थडे पार्टीचा जल्लोष सुरु होता. तर विशेष म्हणजे या वाढदिवसाच्या पार्टीला भाजप आमदार नरेंद्र मेहता, मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर डिम्पल मेहता आणि भाजपचे इतर नगरसेवकांनीही हजेरी लावली.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना तीन जवानांसह मीरारोडचे मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली असताना त्यांच्या घराच्या काही अंतरावरच भाजपचे नगरसेवक यांचा वाढदिवस मात्र मंगळवारी सायंकाळी मोठ्या धुमधडाक्यात आणि डिजेच्या तालावर भाजपने जल्लोषात साजरा केला. शहराच्या महापौर डिम्पल मेहता, स्थानिक आमदार नरेंद्र मेहतासह भाजप नगरसेवक, पदाधिकारयांनी या जल्लोषात सहभागी होत केक खात आणि एकमेकांना खाऊ घालत भाषणे सुध्दा ठोकली. 

शहीद व त्यांच्या कुटुंबियांबद्दल असलेली भाजपच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या या दुटप्पी भूमिकेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. महत्वाचे म्हणजे स्वत: आमदार नरेंद्र मेहतादेखील राणे कुटुंबियांची भेट घेऊन आले होते. केवळ मीरारोडच नव्हे तर राज्य आणि देशात या चार जवानांच्या बलिदानाबद्दल शोक व्यक्त केला जात असताना शीतलनगरच्या बाजुच्याच भागातील भाजप नगरसेवक आनंद मांजरेकर यांनी मात्र आपला मंगळवार ७ ऑगस्ट रोजीचा वाढदिवस जाहीरपणे धूमधडाक्यात साजरा केला.