मुंबई : नांदेड देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Deglur Assembly Bypoll) प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. ईडीची पुढची कारवाई नांदेडला होणार असल्याचे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले होते. त्यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनीही इशारा दिला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर घोटाळा निघाला तर 'करेक्ट टायमिंग' असेल जनता त्यावर शिक्कामोर्तब करतील अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर दबाव आणण्याचा हा प्रयत्न नाही का, असा सवाल प्रवीण दरेकर यांना विचारण्यात आला. यावर बोलताना दरेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी येत्या 30 तारकेला मतदान आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना घेरण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. नवाब मलिक एका अधिकाऱ्यावर बेछूट आरोप करत आहेत, ते टार्गेट करणं नाही का? एखादया मंत्र्याचा घोटाळा काढणे टार्गेट करणे आहे का असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
ईडीची पुढची कारवाई नांदेडला होणार असल्याचे संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. माझ्या हसण्यावरुन समजून घ्या असं ते म्हणाले होते. चंद्रकांत पाटील यांचा अप्रत्यक्ष रोख काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर होता. येत्या 26 किंवा 27 तारखेला किरीट सोमया नांदेडला जाणार आहेत, करा बातमी मोठी असं पाटील म्हणाले होते. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर सोमय्या नांदेडला जाऊन कोणत्या नेत्याविरोधात पत्रकार परिषद घेणार याकडे लक्ष लागल आहे.