मुंबई : बेस्ट कामगारांची वेतन कराराची मागणी २-३ दिवसांत पूर्ण होईल असे आश्वासन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले आहे. मागण्या पूर्ण होत असतील तर संप होण्याचा प्रश्न येत नाही असेही ते म्हणाले. महापालिका आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापकांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेनं बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्व प्रयत्न केले आहेत. कुणी राजकीय कारणांसाठी संप करत असेल तर तो त्यांचा प्रश्न असल्याचेही ते म्हणाले.
कामगारांना ७ वा वेतन आयोग लागु करण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. बेस्ट कामगारांच्या हिताचा निर्णय होईलच. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांवर संप करण्याची वेळ येणार नसल्याचे आमदार अनिल परब यांनी म्हटले आहे.
बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने संप मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. मागण्या मान्य करण्यासाठी बेस्ट प्रशासनाला वेळ दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र २६ ऑगस्टपासून कृती समितीचे सदस्य वडाळा डेपोबाहेर धरणे आंदोलन करणार आहेत.
विशेष म्हणजे ९८ टक्के कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने कौल दिला होता. बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती संप करणार नाही. वेतन करार सुधारणा, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणे आणि पालिका कर्मचाऱ्यांइतका बोनस देण्याच्या प्रश्नावर लवकर तोडगा काढण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.