बाळासाहेब थोरात यांची लवकरच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड

 विधिमंडळ पक्षाचे नेतेपद मिळाल्यानंतर थोरात यांच्याकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही दुसरी मोठी जबाबदारी आहे.

Updated: Jul 2, 2019, 04:20 PM IST
बाळासाहेब थोरात यांची लवकरच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत. बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याची माहिती काँग्रेसमधील सुत्रांकडून मिळाली आहे. तर विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना दिल्लीत मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. 

अशोक चव्हाण यांनी स्वत: दोन दिवसापूर्वी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, पक्षाने त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न देखील केला, पण ते आपल्या राजीनाम्यावर ठाम होते. अखेर अशोक चव्हाण यांच्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय झाला.

अशोक चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ, बाळासाहेब थोरात यांच्या गळ्यात पडणार आहे. विधिमंडळ पक्षाचे नेतेपद मिळाल्यानंतर थोरात यांच्याकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही दुसरी मोठी जबाबदारी आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. निवडणुकीत पक्षाचा केवळ एकच जागा जिंकता आली. तर स्वतः प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा नांदेडमधून पराभव झाला. या पराभवामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नैराश्य आणि हतबलता आली आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा सुरू होती. मात्र दिल्लीत स्वतः राहुल गांधींनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड गोंधळ होता. 

आता या गोंधळातून सावरून तीन महिन्यांवर आलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या निर्णयाची पक्षाकडून लवकरच घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.