बदलापूरहून मुंबईत पोहोचा अवघ्या 30 मिनिटांत; माथेरानच्या पोटातून जातोय रस्ता

Badlapur Panvel Tunnel: बदलापूर ते नवी मुंबई प्रवास आता आणखी जलद होणार आहे. कारण प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 28, 2024, 10:13 AM IST
बदलापूरहून मुंबईत पोहोचा अवघ्या 30 मिनिटांत; माथेरानच्या पोटातून जातोय रस्ता title=
Badlapur to Panvel travel time reduced to 15 minutes second tunnel work complete

Badlapur Panvel Tunnel: बदलापूर ते नवी मुंबई प्रवास आता आणखी सोप्पा होणार आहे. ठाणे जिल्हा ते नवी मुंबई हे दोन्ही शहरे जोडली जाणार आहेत. बडोदा-मुंबई महामार्गावर बदलापूर-पनवेल जोडणारा दुसरा बोगदा पूर्णत्वास आला आहे. पनवेलमधील शिरवली या ठिकाणी या बोगदा बांधला आहे. माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या शिरवली गावापासून हा बोगदा सुरू होत आहे तर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथनजीकच्या भोज गावापर्यंत आहे. 

बदलापूर ते पनवेल असे 4.39 किमीचे दुहेरी बोगदे खोदण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे बोगदे माथेरानच्या डोंगररांगातून खोदले जाणार आहेत. यामुळं बदलापूर आणि नवी मुंबई दोन्ही शहरे जवळ येणार आहेत. बोगद्यात आठ मार्गिका असणार आहेत. यात उंची 13 मीटर आणि रुंदी 23 मीटर आहेत. या रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून जुलै 2025 पर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

एका बोगद्याचे काम ऑगस्टमध्ये पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर जवळपास 18 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. बोगद्याची कामे जवळपास 60 टक्क्याहून अधिक झाले आहे. एकदा का हा रस्ता पूर्ण झाला की बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या 10 मिनिटांत करता येणार आहे. या कामासाठी 1400 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

मुंबई - वडोदरा - जेएनपीटी बंदराला जोडणारा प्रस्तावित महामार्ग ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ तालुक्यातून जात आहे. या महामार्गामुळे बदलापूर शहराला भविष्यात बडोदा आणि जेएनपीटीची थेट कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. यामुळे हा अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. बदलापूरहून पनवेल तालुक्यात जाण्यासाठी माथेरानच्या पर्वतरांगातून बोगदा खोदला जात आहे.  जून 2025 पर्यंत या संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होण्याचे टार्गेट होते.  मात्र, आता जुलै 2025 पर्यत हे काम पूर्ण होईल.  त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.

अटल सेतूवरुन 30 मिनिटात पोहोचणार 

बदलापूर ते मुंबई हा प्रवास अटल सेतूमार्गे 30 ते 40 मिनिटांत पूर्ण होणार आहे. जेएनपीटी बंदर येथून वाहतूक करणाऱ्या वाहनांना बदलापूरमार्गे समृद्धी महामार्ग आणि दिल्ली वडोदरा मार्गाला कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.