Babasaheb Ambedkar Jayanti: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दादर स्थित चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, 'राजगृह' येथील निवासस्थान तसेच परिसरात नागरी सेवासुविधांसह विविध तयारी करण्यात आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी येतात. सदर अनुयायांना विविध प्रकारच्या नागरी सोयीसुविधा पुरवण्याच्या उद्देशाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे.
नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये आदी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर चैत्यभूमी परिसरात लावलेल्या एलईडी स्क्रिनवर चैत्यभूमीतून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यासोबतच सीसीटीव्ही, चैत्यभूमीजवळ समुद्रात जीवरक्षक बोटी आणि अग्निशमन व नियंत्रण कक्ष सेवा आदींचा देखील या सुविधांमध्ये समावेश आहे.
दरवर्षीप्रमाणे, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेतील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी पुरेशा संख्येने नेमलेले आहेत. उपआयुक्त (परिमंडळ प्रशांत सपकाळे आणि सहायक आयुक्त (जी उत्तर) अजितकुमार अंबी यांच्या देखरेखीखाली सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागामार्फत चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासह सभोवतालच्या कठड्याना रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्तूपाची सजावट ही विविध रंगांच्या फुलांनी करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून चैत्यभूमी परिसरातील उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच तोरणा द्वार, अशोक स्तंभाची रंगरंगोटी आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मृती व्हिवींग डेक देखील सजवण्यात आले आहे.