मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 'सिल्वर ओक' (Silver Oak) या निवासस्थानी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन (ST Workers agitation) केले होते. या आंदोलनाची गंभीर दखल घेत राज्य सरकारने कारवाईला सुरुवात केली. या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते (Gunaratna sadavarte) यांना अटक करण्यात आली. सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह 107 आंदोलकांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. पवारांच्या घरावर अचानक आंदोलकांनी धडक दिल्याने पोलीस खात्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ज्यामुळे काही पोलीस अधिकाऱ्यांवर ही कारवाई झाली आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर हल्ला होण्यापूर्वी अभिषेक पाटील (Abhishekh Patil) या व्यक्तीने पवारांच्या घराची रेकी केली होती. अशी माहिती मुंबई पोलिसांकडून कोर्टात देण्यात आली आहे. अभिषेक पाटील हा लातूरचा बडतर्फ एसटी कर्मचारी आहे.
शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी चप्पल फेक आंदोलन केले होते. ज्यामध्ये अभिषेक पाटीलसह औसा आगाराचे बडतर्फ लिपिक अशोक जावके आणि लातूर आगाराचे वाहक दीपक जगदाळे यांचा देखील सहभाग होता. अशी माहिती पुढे येत आहे.
अभिषेक पाटील यांचा याआधी कोणत्याही संघटनेशी संबंधित नव्हते. पण संपाच्या काळात आक्रमक आंदोलनामुळे त्यांच्या 3 गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे.