मुंबई : शिवसेनेने भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. भाजपच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर सेनेकडून देण्यात आले आहे. परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. आमदार आशिष शेलार यांना सध्या काही काम नाही. संपूर्ण भाजप पक्ष बेकार आहे. त्यामुळे खिजवणं, चिडवणं, टिंगलटवाळी करणे हे काम त्यांना उरले आहे. ज्या गोष्टी नीट समजत नाहीत त्यावर त्यांनी बोलू नये, असा सल्लाही परब यांनी शेलारांना दिला आहे.
आमची संकल्पना 'नाईट लाईफ' नाही तर 'मुंबई २४ तास' आहे. त्यांच्या आणि भाजपच्या डोक्यात 'नाईट लाईफ' म्हणजे अय्याशी हेच आहे, 'नाईट लाईफ' ही अय्याशी नव्हे. दारू, पब, वेश्या व्यवसायासाठी रात्री परवानगी आम्ही दिलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांची तयारी नसतानाही नाईटलाईफचा निर्णय लादला.. तज्ञ समितीने आरे कारशेडचा दिलेला अहवाल बंधनकारक नाही म्हणे.
मग आता नुकसान सहन करुन मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का ?
एक दिवस युवराजांनी मला "म्हातारीचा बुट" हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं!— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 30, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरूही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच आहेत. हे मोदींनी मान्य केले आहे. मग मोदी बोलतात ते शरद पवार यांच्या मनातील बोलतायत का? हे त्यांनी स्पष्ट करावे. शेलारांच्या विस्तवात ताकदच नाही की, आग पेटेल, असा जोरदार टोला त्यांनी यावेळी मारला.
कोरगाव - भिमाप्रश्नी कायदेशीर प्रक्रीया सुरू आहे, त्यावर बोलणे उचित होणार नाही. दरम्यान, मनसे सध्या सुपारी घेवून काम करत आहे, अशी टीका मंत्री परब यांनी केली. पूर्वी काँग्रेसची सुपारी घ्यायचे आणि आता भाजपची घेतात. त्यांचे स्वत:चे विचारच राहिलेले नाहीत. झेंडा कुठला वापरायचा, मोर्चा कुठल्या विषयावर काढायचा हे ठरत नाही, ते सध्या गोंधळलेल्या अवस्थेत आहेत आणि त्यांचे मार्गदर्शक भाजप आहे, असा टोला मनसेला शिवसेनेने लगावला आहे.